‘नोबेल’ विजेत्या मुहम्मद युनूस यांना तुरुंगवासाची शिक्षा, कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आढळले दोषी | पुढारी

‘नोबेल’ विजेत्या मुहम्मद युनूस यांना तुरुंगवासाची शिक्षा, कामगार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आढळले दोषी

पुढारी ऑनलाईन डेस्क : नोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांना बांगलादेशमध्ये कामगार कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. यावरून देशात राजकारण तापले आहे. ही संपूर्ण कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला. फिर्यादी खुर्शीद आलम खान यांनी सांगितले की, प्रोफेसर युनूस आणि त्यांच्या तीन ग्रामीण टेलिकॉम सहकाऱ्यांना कामगार कायद्यांतर्गत दोषी ठरवण्यात आले असून त्यांना या प्रकरणात सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. पण अपील प्रलंबित असताना चौघांनाही तात्काळ जामीन मंजूर करण्यात आला आहे.

शिक्षेनंतर राजकारण तापले

लोकांना गरिबीतून बाहेर काढणारी मायक्रोफायनान्स बँक चालवण्यासाठी प्रसिद्ध असलेले मुहम्मद युनूस यांच्यावर पंतप्रधान शेख हसीना यांनी गरिबांचे शोषण केल्याचा आरोप केला आहे. ऑगस्टमध्ये, बराक ओबामा आणि बान की-मून यांच्यासह अनेक जागतिक व्यक्तिमत्त्वांनी मुहम्मद युनूस यांच्यावर झालेल्या कारवाईवर टीका केली होती. यावरून बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा राजकारण तापले आहे.

ओबामांकडून निषेध

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस बान की मून यांच्यासह 160 जागतिक व्यक्तिमत्त्वांनी युनूस यांच्यावर करण्यात आलेल्या न्यायालयीन कारवाईचा निषेध केला होता. तसेच त्यांच्या सुरक्षिततेची आणि स्वातंत्र्याची भीती असल्याचेही म्हटले होते.

Back to top button