सियाचीन ऑपरेशनल पोस्टवर भारताच्या पहिल्या महिला अधिकारी फातिमा वसीम! | पुढारी

सियाचीन ऑपरेशनल पोस्टवर भारताच्या पहिल्या महिला अधिकारी फातिमा वसीम!

लडाख; वृत्तसंस्था : सियाचीन ग्लेशियरच्या मोक्याच्या तसेच धोक्याच्या अतिसंवेदनशील अशा ऑपरेशनल पोस्टवर मेडिकल ऑफिसर/कॅप्टन म्हणून फातिमा वसीम यांच्या रूपात प्रथमच एका महिला अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आली आहे. फातिमा वसीम यांनी भारतीय सैन्यदल क्षेत्रात इतिहास घडविला आहे.

यशस्वीरीत्या चढाई करून डॉ. फातिमा आपल्या पोस्टिंगवर तैनात झाल्या आहेत. 15 हजार फुटांहून अधिक उंचीवर त्या जवानांच्या आरोग्यासह देशाच्या सीमेच्या रक्षणाची जबाबदारी सांभाळत आहेत. भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने सोमवारी एक्सवर एका पोस्टच्या माध्यमातून भारतीय स्त्रीशक्तीच्या द़ृष्टीने अत्यंत अभिमानास्पद असलेली ही माहिती दिली. फातिमा वसीम यांचा एक व्हिडीओही या पोस्टमधून जारी करण्यात आला आहे. फातिमा या सियाचीन बॅटल स्कूलच्या प्रशिक्षणार्थी आहेत. येथे त्यांनी बर्फाळ उंचीवर स्वत:च्या समायोजनासह गिर्यारोहण व शस्त्रास्त्रांचेही प्रशिक्षण घेतले.

स्नो लेपर्ड ब्रिगेडच्या कॅप्टन गीतिका कौल या सियाचीन युद्धभूमीवर तैनात होणार्‍या पहिल्या महिला वैद्यकीय अधिकारी ठरल्या होत्या. आता फातिमा यांनी ऑपरेशनल पोस्टवर नियुक्त होणार्‍या पहिल्या महिला अधिकार्‍याचा मान मिळविला आहे.
फायर अँड फ्युरी कॉर्प्सचे मुख्यालय लेह येथे आहे. ही कॉर्प्स चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात असून सियाचीन ग्लेशियरच्या संरक्षणाची जबाबदारीही सांभाळते.

Back to top button