

पुढारी ऑनलाईन डेस्क : Gautam Adani : शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या अदानी समूहाच्या सर्व दहा कंपन्यांच्या शेअर्समध्ये गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढ दिसून आली आहे. अलीकडेच 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपचा विजय झाल्यानंतर शेअर बाजारातील तेजीमुळे अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांचे मार्केट कॅप वाढले. त्यानंतर गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 20व्या स्थानावरून 16व्या स्थानी पोहचले आहेत.
गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास, गेल्या 6 व्यापार दिवसांमध्ये त्यात 50,000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. शेअर बाजारात सूचिबद्ध अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांच्या समभागांच्या वाढीनंतर अदानी समूहाच्या निव्वळ संपत्तीत सुमारे 3,677 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर गौतम अदानी यांची संपत्ती 70.2 अब्ज डॉलर झाली आहे. यासह ते 20 व्या स्थानावरून 16 व्या स्थानावर पोहोचले आहेत.
अखेर, गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये एवढी वाढ का होत आहे, याचा विचार केला तर, अदानी हिंडेनबर्ग खटल्याची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने अनुकूल टिप्पणी केल्यापासून गुंतवणूकदारांचा त्यांच्यावरील विश्वास परत येऊ लागला आहे. संकटकाळात गौतम अदानी यांनी आपल्या जबाबदाऱ्यांचा निपटारा करण्यासाठी केलेल्या उपाययोजना पाहून बाजारपेठेत त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला आहे. अलीकडेच, अमेरिकन सरकारच्या तपासणीत, शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गने अदानी समूहाबाबत जारी केलेला अहवाल तथ्यहीन असल्यचे घोषित करण्यात आला आहे.
जगातील श्रीमंतांच्या यादीत एलॉन मस्क 220 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह प्रथम स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर ॲमेझोनचे संस्थापक जेफ बेझोस आहेत. त्यांची एकूण संपत्ती 169 अब्ज डॉलर आहे. बर्नार्ड अर्नाल्ट 167 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह तिसऱ्या तर मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स 135 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत. लॅरी एलिसन पाचव्या स्थानावर आहे, ज्यांची एकूण संपत्ती 130 अब्ज डॉलर आहे. स्टीव्ह बाल्मर या यादीत सहाव्या स्थानावर आहे, ज्यांची एकूण संपत्ती 127 अब्ज डॉलर्स आहे. 120 अब्ज रुपयांच्या संपत्तीसह वॉरेन बफे सातव्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर 118 अब्ज डॉलर्ससह लॅरी पेज, 116 अब्ज डॉलर्ससह मार्क झुकेरबर्ग आणि 112 अब्ज डॉलर्ससह सर्जे ब्रिन अनुक्रमे 8व्या, 9व्या आणि 10व्या क्रमांकावर आहेत.