राजौरीत दोन दहशतवादी ठार; जवान शहीद | पुढारी

राजौरीत दोन दहशतवादी ठार; जवान शहीद

श्रीनगर; पुढारी वृत्तसेवा : जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये गेल्या 27 तासांपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू असून, सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरसह त्याच्या एका साथीदाराचाही खात्मा केला आहे. त्यांच्याकडून दारूगोळा आणि शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, या चकमकीत आणखी एक जवान शहीद झाला आहे. आतापर्यंत दोन कॅप्टनसह एकूण 5 सैनिकांना वीरमरण आले आहे.

कारी असे एका ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. सैन्यदलाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, कारी हा पाकिस्तानाचा नागरिक होता. त्याला पाक आणि अफगाण आघाडीवर प्रशिक्षण देण्यात आले होते. त्याच्या साथीदाराची माहिती अजून समोर आलेली नाही. कारी हा लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर होता आणि गेल्या एक वर्षापासून राजौरी-पूंछमध्ये त्याच्या गटासह सक्रिय होता. तो डांगरी आणि कांडी हल्ल्याचा मुख्य सूत्रधारही मानला जातो. पाकिस्तानकडून त्याला जम्मूमध्ये पुन्हा दहशतवादी कारवायांसाठी पाठविण्यात आले होते. तो स्फोटक तज्ज्ञ होता आणि गुहांमधून काम करणारा प्रशिक्षित स्नायपरही होता.बुधवारी, 22 नोव्हेंबर रोजी झालेल्या चकमकीत दोन लष्करी अधिकारी आणि दोन जवान, असे चौघे शहीद झाले होते. गुरुवारी आणखी एक जवान शहीद झाला. त्यामुळे वीरमरण आलेल्या सैनिकांची एकूण संख्या पाच झाली आहे. या चकमकीत एक मेजर आणि दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रांजल बंगळूरचे, शुभम आग्य्राचे निवासी

शहीद झालेले कॅप्टन एम. व्ही. प्रांजल हे बंगळूरचे रहिवासी होते. त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे. कॅप्टन शुभम गुप्ता हे आग्रा शहराचे रहिवासी होते. त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आदरांजली अर्पण केली आहे. हवालदार अब्दुल माजीद यांनाही वीरमरण आले. तथापि, शहीद झालेल्या अन्य जवानांची ओळख अजून पटलेली नाही.

Back to top button