सॅम अल्टमन पुन्‍हा होणार OpenAI सीईओ! | पुढारी

सॅम अल्टमन पुन्‍हा होणार OpenAI सीईओ!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : सॅम अल्टमन ( Sam Altman ) हे OpenAI चे सीईओ म्‍हणून परतणार आहेत, अशी घोषणा कंपनीने आज (दि.२२) केली.  याबाबत कराराचा एक भाग म्हणून OpenAI एक नवीन बोर्ड देखील तयार करत आहे. ब्रेट टेलर , लॅरी समर्स आणि ॲडम डी’एंजेलो यांचा या बोर्डमध्‍ये समावेश असल्‍याचेही कंपनीने स्‍पष्‍ट केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सॅम अल्टमन आणि OpenAI मधील मतभेद समोर आले होते. ओपनएआय बोर्डाने एका व्हिडिओ कॉलवर त्‍यांना सीईओ पदावरुन हटवले होते. अल्‍टमन यांच्‍यासह OpenAI चे सह-संस्थापक ग्रेग ब्रॉकमन यांनाही बोर्डातून काढून टाकण्यात आले होते. यानंतर मोठी खळबळ माजली. आता कंपनीने सॅम अल्‍टमन यांना पुन्‍हा एकदा सीईओपदी नियुक्‍तीसाठी करार केला आहे.

एका ट्विटमध्ये, ओपनएआयने नमूद केले की, कंपनीने अल्‍टमन यांच्‍याशी करार केला आहे. ते कंपनीचे सीईओ म्हणून परत येण्यास तयार आहे. यासाठी ब्रेट टेलर (अध्यक्ष), लॅरी समर्स आणि अॅडम डी’एंजेलो या तीन प्रमुख सदस्यांसह नवीन मंडळाची स्थापना केली जाईल.

सॅम अल्टमन आणि ग्रेग ब्रॉकमन यांनीही या ट्विटला प्रतिक्रिया दिली आहे. ब्रॉकमन यांनी म्‍हटले आहे की, पूर्वीपेक्षा मजबूत आणि अधिक एकसंघपणे परत येणार आहेत. दुसर्‍या ट्विटमध्ये त्‍यांनी नमूद केले की, ते आज रात्री OpenAI च्‍या कोडिंगमध्ये परत येणार आहे.

सॅम अल्टमन यांनी ट्विट केले आहे की, आपल्‍याला ओपनएआय आवडते. “मला ओपनएआय आवडते, जेव्हा मी रविवारी सायंकाळी Microsoft मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा हे स्पष्ट होते की माझ्यासाठी आणि संघासाठी हा सर्वोत्तम मार्ग होता. नवीन बोर्ड आणि सत्याच्या पाठिंब्याने मी OpenAI वर परत येण्यास आणि msft सोबत आमची मजबूत भागीदारी वाढवण्यास उत्सुक आहे.”

हेही वाचा : 

 

Back to top button