‘लष्कर’च्या 5 दहशतवाद्यांना कंठस्नान | पुढारी

‘लष्कर’च्या 5 दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर; वृत्तसंस्था : दक्षिण काश्मीरमध्ये गुरुवारी सायंकाळी कुलगाम जिल्ह्यात सुरू झालेली चकमक तब्बल 20 तासांनंतर संपली. सुरक्षा दलांनी या चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. हे सारेजण लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी असून, त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठाही हस्तगत करण्यात आला. मागील वर्षापासून आतापर्यंत झालेल्या काही दहशतवादी कारवायांत त्यांचा समावेश होता.

कुलगाम जिल्ह्यात सामनू खेड्यात काही दहशतवादी आल्याची खबर मिळाल्यावर पोलिस, लष्कराची राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त मोहिमेला प्रारंभ झाला. या पथकांनी सामनू गावाला वेढा घातला व ज्या घरात दहशतवादी लपले त्या घराच्या दिशेने चाल केली; पण आतील दहशतवाद्यांनी त्यांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला तत्काळ प्रत्युत्तर देण्यात आले.
रात्रीची वेळ असल्याने सुरक्षा दलाच्या पथकांनी दहशतवादी लपलेल्या घराची चांगली घेराबंदी केली व ते निसटू शकणार नाहीत याची खबरदारी घेतली. रात्रभर दोन्ही बाजूंकडून जोरदार गोळीबार होतच होता. या चकमकीत सुरक्षा दलांच्या गोळीबारात अखेर या घराला आग लागल्याने दहशतवाद्यांना बाहेर यावे लागले. त्यानंतर निधड्या आणि लढवय्या जवानांनी या पाचही दहशतवाद्यांना ठार करण्यात यश मिळवले.

पाचही जणांची ओळख पटली

मारल्या गेलेल्या या पाचही दहशतवाद्यांची ओळख पटली असून, समीर अहमद शेख, दानिष थोकर, उमेद पात्रा, हंझारा शाह आणि यासीफ बट अशी त्यांची नावे आहेत. यातील यासीफ बट कुलगामचा आहे, तर उर्वरित पाचही दहशतवादी शोपियाचे आहेत. ते लष्कर-ए-तोयबासाठी काम करत. त्यांच्याकडून चार रायफली, दोन पिस्तूल, चार हँड गे्रनेड, चाकू आणि काडतुसांचा मोठा साठा जप्तआला.

Back to top button