पृथ्वी तापली : मृत्यू दरात वाढ अटळ; जगातील 52 संस्थांनी केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष जाहीर | पुढारी

पृथ्वी तापली : मृत्यू दरात वाढ अटळ; जगातील 52 संस्थांनी केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष जाहीर

लंडन ः वृत्तसंस्था जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीचे तापमान या शतकाच्या अखेरीस दोन अंश सेल्सिअसने वाढले, तर शतकाच्या मध्यापर्यंत उष्णतेमुळे वार्षिक मृत्यूंमध्ये 370 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. हे प्रमाण सध्याच्या संख्येच्या 5 पट असणार आहे. म्हणजे स्थिती भयानक असल्याची माहिती जगातील 52 संस्थांनी केलेल्या संशोधनातून समोर आली आहे.

वैज्ञानिक मासिक ‘द लॅन्सेट’ने यासंदर्भात एक अभ्यासपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये तापमानवाढीचा भीषण तपशील मांडण्यात आला आहे. त्यानुसार या शतकाच्या अखेरीस एकूण तापमानात कोणत्याही परिस्थितीत दीड अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढ होऊ नये, यासाठी जगभर नेटाने प्रयत्न होणे गरजेचे आहे.

मानवी जीवन धोक्यात

जगभरात उष्णतेच्या लाटेमुळे मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या वाढत आहे. हवामान बदलामुळे जगभरातील अब्जावधी लोकांचे जीवन आणि उपजीविका धोक्यात असल्याची माहिती ‘द लॅन्सेट काऊंटडाऊन’च्या कार्यकारी संचालक मरिना रोमेनेलो यांनी दिली आहे.

११४ तज्ज्ञांचे योगदान

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील संशोधकांच्या नेतृत्वाखाली, हे विश्लेषण जागतिक आरोग्य संघटना आणि जागतिक हवामान संघटनेसह जगभरातील 52 संशोधन संस्थांनी केले आहे. यामध्ये 114 प्रमुख तज्ज्ञांनी आपले योगदान दिले आहे.

Back to top button