वॉशिंग्टन/लंडन, वृत्तसंस्था : अमेरिका व ब्रिटनमध्ये राहणार्या मूळ भारतीयांनी गेल्यावर्षी 2.74 लाख कोटी रुपये मायदेशी (भारतात) पाठवले आहेत. अमेरिकेतून 1.91 लाख कोटी रुपये, तर ब्रिटनमधून 83 हजार कोटी रुपये भारतात आले आहेत.
येत्या 5 वर्षांत वरीलप्रमाणे दोन्ही देशांतून भारतात पाठवली जाणारी रक्कम दुपटीवर जाईल, असे भाकीत जागतिक बँकेच्या एका अलीकडील अहवालातून वर्तविण्यात आले आहे.
अमेरिका व ब्रिटनमधील भारतीयांनी मिळून मायदेशी पैसे पाठविण्यात सौदी, यूएई, कतार आदी अरब देशांतील भारतीयांनाही मागे टाकले आहे. अरब देशांतून गेल्यावर्षी 2.33 लाख कोटी रुपये भारतात आले होते. उच्च कौशल्य भारतीय व्यावसायिकांपैकी 48 टक्के अमेरिका-ब्रिटनमध्ये आहेत. दुसरीकडे, अरब देशांतील बहुतांश भारतीय हे कामगार तसेच किमान व मध्यम कौशल्यप्राप्त व्यावसायिक आहेत, हे येथे महत्त्वाचे.
आकडे बोलतात…
* 43% भारतीयांचे (अमेरिकेत जन्मलेल्या) पदवी-पदव्युत्तर शिक्षण झालेले आहे
* 58 लाख रुपये वार्षिक सरासरी उत्पन्न सामान्य अमेरिकन कुटुंबांचे आहे
* 1 कोटी रुपये अमेरिकेतील भारतीय कुटुंबांचे सरासरी वार्षिक उत्पन्न आहे
* 85% ब्रिटिश भारतीय इंग्रजीत तरबेज आहेत. ब्रिटनमधील इतर आशियाई समुदायात हे प्रमाण 70 टक्के आहे
* 50 लाख रुपये ब्रिटनधील भारतीय कुटुंबांचे सरासरी वार्षिक उत्पन्न आहे; तर इंग्रज कुटुंबांचे ते 48 लाख रुपये इतके आहे
* 26% घट गेल्या 5 वर्षांत अरब देशांतून भारतात येणार्या पैशांत झालेली आहे
* 10% वाढ या कालावधीत अमेरिका-ब्रिटनमधून भारतात येणार्या पैशांत झाली आहे