

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानात हिंदूंवरील हल्ले आणि अत्याचारामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. एका हिंदू तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या घटनेनंतर आता कट्टरपंथीय हिंदू मंदिरांवर कब्जा करत असल्याची माहिती समोर आली आहे. याची दखल ना स्थानिक प्रशासन घेत आहे ना पोलिस घेत नसल्याने हिंदूंच्या अडचणीत वाढ होत आहे.
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील उमरकोट हे हिंदूबहुल आहे. व्यवसाय करून येथील बहुसंख्य हिंदू आपला उदरनिर्वाह चालवतात, पण सातत्याने मुस्लिम कट्टरपंथीय नाक खुपसत असल्याचे समोर आले आहे. हिंदूंच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न केला जात असताना आता हिंदू मंदिरांच्या जमिनींवर कब्जा करण्याचा प्रयत्न कट्टरपंथीयांकडून केला जात आहे. उमरकोटमधील ऐतिहासिक दादा खेतरमपाल अस्थान शिवमंदिराच्या जमिनीवर कट्टपंथीयांनी कब्जा करण्यास सुरुवात केली आहे. याठिकाणी शॉपिंग मार्केट तयार करण्याचा घाट घातला जात आहे.
शिवमंदिराच्या समितीच्या म्हणण्यानुसार, मंदिराची जमीन स्वातंत्र्यापूर्वी 1913 मध्ये दादा खेतरमाल मंदिराच्या नावे रजिस्टर करण्यात आली होते. तरीही मंदिरावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्थानिक प्रशासनाला पुरावे दिले गेले असतानाही कट्टरपंथीयांच्या प्रयत्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. आता हिंदू लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.