गाझावरील चर्चेत पाकिस्तानकडून काश्मीरचे तुणतुणे | पुढारी

गाझावरील चर्चेत पाकिस्तानकडून काश्मीरचे तुणतुणे

न्यूयॉर्क; वृत्तसंस्था : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सारे सदस्य गाझातील युद्धावर गांभीर्याने चर्चा करत असताना पाकिस्तानने गाझा व काश्मीरची तुलना करीत पुन्हा एकदा काश्मीरचे तुणतुणे वाजवण्याचा प्रयत्न केला. यावर भारताने पाकिस्तानचे हे उद्योग नेहमीचे असून, त्यावर फार काही भाष्य करून त्यांना मोठेपणा देण्याची इच्छा नाही, असे सणसणीत उत्तर दिले.

गाझामधील युद्धस्थितीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक न्यूयॉर्कमधील मुख्यालयात सुरू आहे. तेथे सदस्य देशांनी गाझामधील स्थितीबाबत चिंता व्यक्त करीत संघर्ष लवकरात लवकर थांबवण्याबाबत काय करता येईल, यावर विचार मंथन केले. या बैठकीत पाकिस्तानने खोडसाळपणे काश्मीराचा विषय उकरून काढला. पाकिस्तानी राजदूत मुनीर अक्रम यांनी गाझा असेल किंवा काश्मीर असेल, दोन्ही ठिकाणच्या नागरिकांचे रक्षण करण्यास संयुक्त राष्ट्र अपयशी झाल्याचे म्हटले. ते म्हणले की, इस्रायलने ज्याप्रमाणे पॅलेस्टाईनचा भूभाग घशात घातला आहे तसेच 9 लाख सैन्य उभे करीत भारताने काश्मिरींचा स्वातंत्र्य लढा चिरडून टाकला आहे. त्यांच्या या विधानाला भारताने काडीची किंमत न देत एकच सणसणीत टोला लगावला. भारताचे उपराजदूत आर. रवींद्र यांनी आपल्या भाषणात गाझातील संघर्षाबाबत सविस्तर भाष्य केल्यावर जाता जाता उत्तर दिले. ते म्हणाले की, एका सदस्य देशाची ही खोडच आहे. त्यांनी पुन्हा भारताचा अविभाज्य भाग असलेल्या केंद्रशासित प्रदेशांबाबत विधान केले आहे. या विधानांना भारत त्याच्या लायकीप्रमाणेच किंमत देतो. त्यामुळे त्याला प्रत्युत्तर देऊन मोठेपणा देण्याची भारताची इच्छा नाही. तेवढा वेळही नाही.

मुंबई हल्ला, किबुत्झ हल्ला हे दहशतवादी हल्लेच : अमेरिका

या बैठकीत बोलताना अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन म्हणाले की, दहशतवादाच्या सर्व घटना या बेकायदा आणि असमर्थनीय आहेत; मग तो लष्कर-ए-तोयबाने केेलेला मुंबईवरील हल्ला असेल किंवा हमासने किबुत्झ बीरीवर केलेला हल्ला असेल. असली हत्याकांडे पुन्हा होऊ नयेत यासाठी प्रत्येक देशाला स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. हमास किंवा कोणत्याही दहशतवादी संघटनांना अशी कृत्ये करण्यासाठी शस्त्रे, पैसा आणि प्रशिक्षण देणार्‍या सदस्य राष्ट्रांचा धिक्कार करणे हे सुरक्षा परिषदेचे कर्तव्य आहे.

Back to top button