पुढारी ऑनलाईन डेस्क: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत 4500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इस्रायलने पॅलेस्टाईनमधील पश्चिम किनाऱ्यावर असलेली 'अल अन्सार' मशीद उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला आहे. रविवारी (दि.२२) इस्रायली सैन्याने वेस्ट बँकमधील जेनिनच्या अल अन्सार मशिदीवर हवाई हवाई हल्ला केला. अशी माहिती इस्रायल डिफेन्स फोर्सच्या प्रवक्त्याने X अकाऊंटवरून दिली आहे. (Israel-Hamas War)
इस्रायलने वेस्ट बँकमधील जिनान येथे असलेली अल अन्सार मशीद हवाई हल्ल्यात उद्ध्वस्त केली. दहशतवादी संघटना हमासकडून या मशिदीचा कमांड सेंटर म्हणून वापर केला जात असल्याचा दावा देखील इस्रायली लष्कराने केला आहे. हमास या ठिकाणाहून हल्ले आणि इस्रायलींना मारण्याची योजना आखत होते. लेबनॉनमधूनही इस्रायलवर हल्ले होत आहेत. गेल्या १४ दिवसांत त्याचे १४ सदस्य मारले गेल्याचा हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेने दावा केला आहे.(Israel-Hamas War)
'अल अन्सार' मशीदीवर झालेल्या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेलेत, असा दावा इस्रायलने केला आहे. तर पॅलेस्टिनी प्रशासनाचे मशिदीवरील हवाई हल्ल्यात केवळ एकाचा मृत्यू झाला आहे, असे म्हटले आहे. ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने पश्चिम किनाऱ्यावर दुसऱ्यांदा हवाई हल्ले केले. इस्रायलने जेनिन निर्वासित छावणीजवळील अल अन्सार मशिदीला लक्ष्य केले. इस्रायलचे म्हणणे आहे की, पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद दहशतवादी संघटन हमासने ही मशिद आपले तळ बनवले होते आणि येथूनच हल्ल्यांची योजना आखण्यात आली होती.
इस्रायली लष्कराने या हल्ल्याची छायाचित्रेही जारी केली असून, मशिदीतून मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि शस्त्रे गोळा करण्यात आल्याचा दावा केला आहे. याशिवाय मशिदीमध्ये बंकरही बांधण्यात आले होते. याआधीही इस्रायलने या भागात हवाई हल्ले केले होते. या भागात पॅलेस्टिनी मोठ्या संख्येने राहतात. हल्ल्यानंतर समोर आलेल्या छायाचित्रांनुसार या हल्ल्यात मशिदीचा मोठा भाग कोसळला आहे. लोक ढिगारा हटवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियावर अनेक फुटेजही दिसले ज्यामध्ये रुग्णवाहिकेचा सायरन ऐकू येत होता.