पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्त्रालय-हमास युद्धाचा आज (दि.1 ) तेरावा दिवस आहे. या रक्तरंजित संघर्षात आतापर्यंत पाच हजारांपेक्षा अधिक जणांचा बळी गेला आहे. गाजा शहरातील ३,५०० तर इस्त्रायलमधील १४०० हून अधिक नागरिक ठार झाले आहेत. दहशतवादी संघटना हमासला इराणची मदत मिळत असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. हमासकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेल्या शस्त्रसाठ्याबाबतही चर्चा असतानाच आणखी एका देशाचे नाव समाेर आले आहे. ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासने केलेल्या भीषण हल्ल्यात उत्तर कोरियाची शस्त्रे वापरण्यात आल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये उत्तर कोरिया ( North Korean weapons ) हमासला शस्त्र विक्री करत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे वृत्त 'द इस्त्रायल टाइम्स'ने दिले आहे.
हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर भीषण हल्ला केला. यावेळी वापरण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांचे तज्ज्ञांनी विश्लेषण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दक्षिण कोरियाच्या लष्करी गुप्तचरांसह, हमासने F-7 रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेडचा वापर केल्याचे दाखवले आहे. F-7 रॉकेट हे खांद्यावर वाहून नेता येतात. याचा वापर प्रामुख्याने लष्कराच्या वाहनाविरुद्ध करण्यात येताे. हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलच्या सैनिकांच्या वाहनांवर अशाच प्रकारची रॉकेट डागली आहेत. समोर आलेला हा पुरावा बेकायदेशीर शस्त्रास्त्रांच्या व्यापाराच्या जगावर प्रकाश टाकतो. ( North Korean weapons )
शस्त्रास्त्र संशोधन सेवा संस्थेचे संचालक एनआर जॅन्झेन-जोन्स यांनी असोसिएटेड प्रेसशी बोलताना सांगितले की, एफ-7 रॉकेट हे सीरिया, इराक, लेबनॉन आणि गाझा पट्टीमध्ये लढाईत वापरला गेला आहे. उत्तर कोरियाने पॅलेस्टिनी दहशतवादी गटाला दीर्घकाळ मदत केली आहे. तर आर्म्स सर्व्हेचे वरिष्ठ संशोधक मॅट श्रोडर, स्मॉल यांनी म्हटले आहे की, "हमासने त्यांच्या प्रशिक्षणाचे फोटो जारी केले आहेत. यात फायटर प्लेनचे चित्रण करण्यात आले आहे ज्यात शस्त्रास्त्रे आहेत ज्याच्या वॉरहेडवर लाल पट्टी आहे. याशिवाय त्याची रचना F-7 शी जुळते आहे. हमासला उत्तर कोरियाकडून शस्त्रे मिळाले आहेत याचे मला आश्चर्य वाटत नाही."