32 रुपयांचे पुस्तक खरेदी केले चक्क 11.26 लाखांना! | पुढारी

32 रुपयांचे पुस्तक खरेदी केले चक्क 11.26 लाखांना!

लंडन, वृत्तसंस्था : ‘जुने ते सोने’ या उक्तीप्रमाणे जुन्या वस्तूंचे महत्त्व आपण समजू शकतो. काही लोक तर जुन्या वस्तूंचे कलेक्शन करून ठेवतात. अशा दुर्मीळ वस्तूंना बाजारातही मोठी बोली लावली जाते. अशातच एक अनोखा प्रकार समोर आला आहे.

याची माहिती घेतल्यास तुम्हीही चक्रावून जाल. खरे तर केवळ 32 रुपयांत खरेदी केलेले एक पुस्तक चक्क 11 लाख 26 हजार रुपयांना विकले गेले. हा काही तोट्याचा व्यवहार नसल्याचे हे पुस्तक खरेदी करणार्‍याचे म्हणणे आहे. 1997 मध्ये छापण्यात आलेले हे पुस्तक एका ग्रंथालयात सांभाळून ठेवले होते. त्याची विक्री आता सुमारे 26 वर्षांनी करण्यात आली आहे. ब्रिटनमधील व्होल्वरहॅप्मटन ग्रंथालयाने हे पुस्तक विकले आहे. इतके जुने पुस्तक ग्रंथालयात ठेवू शकत नसल्याने ते विक्रीस काढले असल्याचे ग्रंथालयाचे म्हणणे आहे. 1997 मध्ये प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या 500 कॉपीज् काढण्यात आल्या होत्या. त्यातील 300 पुस्तके ब्रिटनमधील ग्रंथालयाला दिली होती. 11 लाख 26 हजार रुपयांना खरेदी केलेले हे पुस्तक हॅरी पॉटर या सीरिजमधील आहे. हॅरी पॉटर पुस्तकांचे जगभरात चाहते आहेत. रिचर्ड विंटनर नावाच्या व्यक्तीने सर्वाधिक 11 लाख 26 हजार रुपयांची बोली लावत हे पुस्तक खरेदी केले आहे.

Back to top button