अदानींना मागे टाकत अंबानी अव्वल | पुढारी

अदानींना मागे टाकत अंबानी अव्वल

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अदानी समुहाचे गौतम अदानी यांना पिछाडीवर टाकत फोर्ब्ज ने जारी केलेल्या भारतातील सर्वाधिक 100 श्रीमंताच्या यादीत अव्वल स्थान पटकाविले आहे. गेल्या वर्षी या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या गौतम अदानी यावर्षी दुसर्‍या स्थानी आले आहेत. हिंडेनबर्ग अहवालामुळे त्यांचे स्थान घसरल्याची चर्चा आहे.

फोर्ब्ज नियतकालिकेच्यावतीने ही यादी जाहीर केली आहे. भारतातील 100 श्रीमंताची संपत्ती 799 अब्ज डॉलरएवढी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून साम्राज्य निर्माण केलेले मुकेश अंबानी यांची संपत्ती 92 अब्ज डॉलर आहे. जिओ फिनॅनशीअल सर्विसच्या माध्यमातून रिलायन्सचा विस्तार वाढला असून अंबानी यांनी ऑगस्ट महिन्यात आपल्या तिन्ही मुलांची रिलायन्सच्या मंडळात संचालकपदी (नॉन इक्झिक्युटीव्ह) नियुक्ती केली आहे. गौतम अदानी यांनी गेल्यावर्षी अंबानी यांना मागे टाकत प्रथम क्रमांक मिळविला होता. जानेवारी महिन्यात हिंडेनबर्ग अहवालामुळे त्यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये घट झाल्यामुळे या वर्षी ते दुसर्‍या स्थानी आले आहेत.

जयसिंघानी सर्वाधिक गुण

उद्योगपती इंदर जयसिंघानी यांचे या यादीत 32 वे स्थान आहे. त्यांची संपत्ती6.4 अब्ज डॉलर असून गेल्या वर्षभरात त्यांच्या संपत्तीत दुप्पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे 100 श्रीमंतापैकी सर्वाधिक गुण (पर्सेटेंज गेनर) जयसिंघानी यांना मिळाले आहे. पॉलिकॅब इंडियाचे ते मालक असन वायर आणि केबलच्या माध्यमातून त्यांनी आपल्या व्यवसायाचा झपाट्याने विस्तार केला आहे.

तिघा नवोदितांचा समावेश सात जणांना पुन्हा स्थान

लँडमार्कच्या समूहाच्या रेणुका जगतियानी, आसियन पेंटसच्या आश्विन दानी, गारमेंट उद्योगपती के.पी.रामास्वामी या तिघांनी प्रथमच फोर्ब्जच्या यादीत स्थान पटकाविले आहे. तर रंजन पै यांच्यासह सात उद्योगपतींनी या यादीत पुन्हा स्थान पटकाविले आहे.

Back to top button