तेल अवीव; वृत्तसंस्था : इस्रायल-हमासच्या युद्धाने आता उग्र स्वरूप घेतले असून इस्रायलने हमासचा पूर्णपणे नायनाट करण्याचाच चंग बांधून आपले हल्ले तीव— केले आहेत. इस्रायलच्या सैन्याने घोषणा केली आहे की, त्यांनी गाझाच्या सीमेवर कब्जा मिळवला आहे. दरम्यान, इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलेंट यांनी म्हटले आहे की, हमासचा अर्थमंत्री जवाद अबू शामला हा इस्रायलच्या हवाई दलाच्या हल्ल्यात ठार झाला आहे. तसेच हमासचा आणखी एक म्होरक्या झकारिया अबू मामर हा सुद्धा या हल्ल्यात ठार झाला आहे.
इस्रायलने युद्ध सुरू झाल्यापासून गाझाच्या 1707 ठिकाणांना लक्ष्य बनवले आहे. यामध्ये सुमारे 475 रॉकेट सेंटर्स, 23 स्ट्रॅटेजिक साईटस् आणि 22 जमिनीखालील ठिकाणांचा समावेश आहे. सोमवारीही रात्रभर गाझाच्या दोनशे ठिकाणांना लक्ष्य बनवून तीव— मारा करण्यात आला. 'हमास'च्या 1500 दहशतवाद्यांचा आतापर्यंत खात्मा करण्यात आला आहे. दरम्यान, युद्धाच्या चौथ्या दिवशी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून परिस्थितीची माहिती दिली. मोदी यांनी ट्विट करून या फोन कॉलबद्दल नेतान्याहू यांचे आभार मानले आणि भारत या संकटाच्या काळात इस्रायलबरोबर भक्कमपणे उभा असल्याचे म्हटले.
'टाईम्स ऑफ इस्रायल'ने म्हटले आहे की, इस्रायलच्या सैन्याने गाझा बॉर्डरवर कब्जा मिळवल्याची घोषणा केली आहे. इस्रायलने रात्रभर हमासच्या अनेक ठिकाणांवर जोरदार हल्ला चढवला. त्यामध्ये 1500 दहशतवादी ठार झाले. युद्धात आतापर्यंत इस्रायलचे सुमारे 123 सैनिकही मृत्युमुखी पडले आहेत. दुसरीकडे हमासच्या हल्ल्यात थायलंडच्या 18 नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. अर्जेंटिनाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, युद्धात त्यांच्या सुमारे 7 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या युद्धात आतापर्यंत एकूण 1587 लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलमध्ये 900 लोक मारले गेले तर 2300 लोक जखमी झाले. गाझा पट्टीत 140 मुलांसह 687 पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले. तसेच 3726 लोक जखमी झाले. लेबनान सीमेवरील संघर्षात इस्रायलच्या डेप्युटी सैन्य कमांडरचा मृत्यू झाल्याची सोमवारी रात्री उशिरा इस्रायलने पुष्टी केली.
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे की, हमासने आमच्यावर हल्ला करून घोडचूक केली आहे. आम्ही त्याची किंमत पुरेपूर वसूल करणार आणि त्यांना असा धडा शिकवणार, जो हमास आणि इस्रायलचे अन्य शत्रू पिढ्यान्पिढ्या लक्षात ठेवतील.
अमेरिकेने इस्रायलला लष्करी पाठिंबा देण्याचीही तयारी दर्शवली आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनी म्हटले आहे की, इस्रायलच्या मदतीसाठी आमची जहाजे आणि लढाऊ विमाने इस्रायलकडे कूच करीत आहेत. आम्ही यूएसएस जेराल्ड आर फोर्ड एअरक्राफ्ट कॅरियरलाही अलर्ट केले आहे.
इस्रायलने हल्ले थांबवावेत आणि हमासने ओलिसांना सोडवावे यासाठी कतार आणि इजिप्तने मध्यस्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. इजिप्तने अनेक वेळा मध्यस्थी केली आहे. दुसरीकडे तुर्कियेचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी म्हटले आहे की, दोन राष्ट्रांची निर्मितीच या समस्येवर उपाय आहे. याप्रकरणी आम्ही मध्यस्थी करण्यास तयार आहोत.
इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी मंगळवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून सद्य:स्थितीची माहिती दिली. मोदी यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट करून म्हटले की, मी पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे त्यांनी केलेला फोन व सद्य:स्थितीची माहिती दिल्याबद्दल आभार मानतो. भारताचे लोक या संकटाच्या काळात इस्रायलबरोबर ठामपणे उभे आहेत. भारत दहशतवादाच्या सर्व रूपांचा आणि अभिव्यक्तींचा मजबुतीने आणि स्पष्टपणे निषेध करतो.