वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : इस्रायल-हमास युद्धात इराणची सक्रिय भूमिका असल्याचे समोर येत असून, आर पार की लढाईची घोषणा करणार्या इस्रायलने अधिक आक्रमक भूमिका घेतल्यास संपूर्ण मध्य पूर्वेतच युद्धाचा वणवा भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. अरब राष्ट्रांतही या विषयावरून संभ्रमाचे वातावरण असून, आगामी 48 तासांत इस्रायलमध्ये काय घडामोडी होतात यावर युद्धाची व्याप्ती किती वाढेल, ते अवलंबून आहे.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ताज्या इस्रायल-हमास संघर्षात इराणची भूमिका केंद्रस्थानी येत असल्याने हे युद्ध इस्रायल व पॅलेस्टिनपुरते न राहता, युद्ध सगळ्या मध्य पूर्वेतच पसरण्याची भीती आहे. इस्लामिक जिहाद आणि हमास या पॅलेस्टिनी संघटना आणि लेबेनॉनमधील हिजबुल्ला या संघटना इराणच्या पाठिंब्यावर चालतात. शनिवारी हमासने हल्ला चढवल्यानंतर इस्लामिक जिहादने आपण हमाससोबत असल्याचे जाहीर केले. दुसरीकडे, लेबेनॉनमधील हिजबुल्लाने हमासला पाठिंबा देतानाच लेबेनॉनमधून इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागत संघर्षात थेट उडी घेतली.
मागील काही महिन्यांत मध्य पूर्वेत याबाबत घडलेल्या काही घटना यासाठी महत्त्वाच्या आहेत. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनीर गार्डच्या कुदस् फोर्सचे प्रमुख जनरल इस्माईल कानी यांनी मागील काही महिन्यांत हमास, हिजबुल्ला आणि इस्लामिक जिहादच्या नेत्यांच्या सतत बैठका घेतल्या. मध्य पूर्वेत इस्रायलविरोधी आघाडी अधिक सुनियोजित आणि मजबूत करण्यासाठी त्यात चर्चा झाली. याच बैठकांनंतर हमासचा शनिवारचा हल्ला झाला असावा, असे पाश्चात्त्य निरीक्षकांचे मत आहे.
हमासचे समर्थक देश
इस्रायलच्या विरोधात असलेले मध्य पूर्वेतील देश पॅलेस्टिनी संघटनांच्या पाठीशी आहेत. वेगवेगळ्या संघटनांना त्यांचा पाठिंबा असतो. पण हमास ही तेथील सर्वात मोठी संघटना आहे. इराण हा हमास आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाह या दोन संघटनांचा सर्वात मोठा समर्थक देश आहे. तो त्यांना शस्त्रपुरवठा व आर्थिक बळ पुरवत असतो. या शिवाय मध्य पूर्वेतील सीरिया आणि येमेन हे देश हमासचे पाठीराखे मानले जातात. कतारने या संघर्षाला इस्रायल जबाबदार आहे, अशी भूमिका घेतल्याने त्यांचा कल हमासकडे झुकल्याचे विश्लेषक सांगतात. तर याच धर्तीवर अरब लीग ही अरब देशांची संघटना आणि जॉर्डन हेही भूमिका घेतात. इजिप्त, मोरोक्को आणि सौदी अरेबिया यांनी सध्याच्या संघर्षात तटस्थ राहणे पसंत केले आहे.
जागतिक पातळीवर विचार केला, तर इस्रायलने हमासला दहशतवादी संघटना घोषित केले. पाठोपाठ युरोपियन समुदाय, कॅनडा, इजिप्त आणि जपाननेही तशीच घोषणा केली. 2018 मध्ये अमेरिकेने हमासच्या कारवायांचा धिक्कार करणारा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मांडला होता; पण तो व्हेटो वापरून फेटाळला गेला.
गाझापट्टीपासून तेल अवीवपर्यंत
शनिवारी हमासने चढवलेल्या हजारो क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात इस्रायलच्या गाझापासून तेल अवीवपर्यंतचा भाग होरपळून निघाला. याशिवाय गाझापट्टीला लागून असलेल्या शहरांत व वसाहतींमध्ये घुसून हमासच्या टोळ्यांनी हल्ले केले. या एकीकडे जमिनीवरून आणि आकाशातून क्षेपणास्त्रांच्या मदतीने हल्ले करतानाच, यावेळी प्रथमच हमासने समुद्रीमार्गाचा वापर करीत इस्रायली शहरांत घुसण्याचा व त्या भागांवर क्षेपणास्त्र व रॉकेटचा मारा करण्याचे धोरण अवलंबले. त्यामुळे तेल अवीव, रिशॉन लेझियॉन, अशदोद, अश्केलॉन या मोठ्या शहरांना जबर फटका बसला. तर सिदरॉत आणि इतर अनेक छोटी गावे जी गाझापट्टीला लागून आहेत, तीही हमासच्या हल्ल्यात भरडली गेली. कुंपणे तोडून हमासच्या वाहनांनी शेकडो दहशतवादी या भागांत घुसले व त्यांनी त्या वसाहतींचा ताबाच घेतला. सिदरॉतमध्ये तर पोलिस स्टेशन बुलडोझर लावून पाडत आतमध्ये बंदी बनवलेल्या एका पॅलेस्टिनीची सुटका करण्यात आली.