बीजिंग; वृत्तसंस्था : चीनच्या आण्विक पाणबुडीला झालेल्या अपघातात 55 सैनिक मरण पावल्याची भीती वर्तविली जात आहे. पिवळ्या समुद्रात चीननेच टाकलेल्या साखळी आणि अँकरला ही पाणबुडी धडकली आणि त्यामुळे पाणबुडीतील ऑक्सिजन यंत्रणा उद्ध्वस्त झाली.
ब्रिटिश आणि अमेरिकन पाणबुड्यांनी या भागात येण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना अटकाव घालता यावा, म्हणून हा अडथळा म्हणजे चीननेच लावलेला चक्रव्यूह होता आणि त्यात दुर्दैवाने चीनच अडकला. चीनने साखळी आणि अँकर या भागात लावलेले होते. मात्र, या सापळ्यात त्यांचीच पाणबुडी अडकली. ऑक्सिजन यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्यासाठी 6 तास अपेक्षित होते. यादरम्यान पाणबुडीतील ऑक्सिजन कमी झाले आणि गुदमरल्याने पाणबुडीतील सर्वांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये कॅप्टन कर्नल जू योंग-पेंग आणि 21 अधिकार्यांचा समावेश आहे. ऑगस्टअखेरीस घडलेल्या या घटनेबाबत 'डेली मेल' दैनिकाने दिलेल्या वृत्ताला चिनी अधिकार्यांनी मात्र अद्याप दुजोरा दिलेला नाही.
याआधी ऑगस्ट 2000 मध्ये रशियन आण्विक पाणबुडीत स्फोट होऊन 118 खलाशांचा मृत्यू झाला होता. रशियानेही सुरुवातीला हे वृत्त नाकारले होते.