पुढारी ऑनलाईन डेस्क : Nobel Prize 2023 : 2023 सालच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यास आज, सोमवारपासून (2 ऑक्टोबर) सुरुवात झाली. पहिल्या दिवशी वैद्यकशास्त्रातील उल्लेखनीय कार्यासाठी हंगेरीच्या कॅटलिन करिका आणि अमेरिकेच्या ड्र्यू वेसमन या शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.
न्यूक्लिओसाइड बेस मॉडिफिकेशनशी संबंधित शोधांसाठी कॅरिको आणि वेसमन यांना हा सन्मान देण्यात येत असल्याचे नोबेल पारितोषिक समितीने स्पष्ट केले. या शोधामुळे कोरोनाव्हायरस म्हणजेच कोविड 19 (COVID-19) विरुद्ध प्रभावी एमआरएनए (mRNA) लस विकसित करण्यात मदत झाली. (Nobel Prize 2023)
नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी कोरोलिंस्का इन्स्टिट्यूटमध्ये विजेत्याची घोषणा केली. नोबेल पारितोषिकात 10 दशलक्ष स्वीडिश क्रोनर म्हणजेच अंदाजे 7.5 कोटी रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाते. ही रक्कम 10 डिसेंबर रोजी दिली जाईल. (Nobel Prize 2023)
mRNA किंवा मेसेंजर RNA हा अनुवांशिक कोडचा एक छोटासा भाग आहे. जो आपल्या पेशींमध्ये प्रथिने बनवतो. सोप्या भाषेत हे देखील समजू शकते की जेव्हा एखादा विषाणू किंवा जीवाणू आपल्या शरीरावर हल्ला करतात तेव्हा mRNA तंत्रज्ञान आपल्या पेशींना त्या विषाणू किंवा बॅक्टेरियाशी लढण्यासाठी प्रथिने तयार करण्याचा संदेश पाठवते. यामुळे, आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला आवश्यक असलेली प्रथिने मिळतात आणि आपल्या शरीरात अँटीबॉडी तयार होतात. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ही लस पारंपरिक लसीपेक्षा लवकर बनवू शकते. यासोबतच शरीराची प्रतिकारशक्तीही मजबूत होते. जगात पहिल्यांदाच mRNA तंत्रज्ञानावर आधारित लस बनवली जात आहे.
नोबेल पुरस्कारासाठी यंदा विविध क्षेत्रातील 351 उमेदवार रेसमध्ये आहेत. नोबेल पारितोषिक 1901 मध्ये सुरू झाल्यापासून 2023 पर्यंत वैद्यकीय क्षेत्रातील 227 लोकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.