

पुढारी ऑनलाईन डेस्क : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याच्या आरोपानंतर भारत आणि कॅनडातील द्वीपक्षीय संबंध बिघडले आहेत. या दोन्ही देशांमधील राजनैतिक वादाच्या दरम्यान गुरूवारी (दि.२८) एका पत्रकार परिषदेत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी 'भारताशी घनिष्ठ संबंध निर्माण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. (India-Canada Issue)
भारत आणि कॅनडा यांच्यात सुरू असलेल्या राजनैतिक वादात भारताने कॅनडाला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. आता कॅनडाचा सूर बदलताना दिसत आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले की, कॅनडा अजूनही भारतासोबतचे संबंध मजबूत करण्यासाठी समर्पित आहे. जस्टिन ट्रुडो यांनीही भारत ही वाढती आर्थिक शक्ती असून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही हे मान्य केले. (India-Canada Issue)
कॅनडा पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, सध्या भारत हा एक वाढती आर्थिक शक्ती आहे आणि भू-राजकीयदृष्ट्याही खूप महत्त्वाची आहे. गेल्या वर्षी आम्ही इंडो-पॅसिफिक रणनीती जाहीर केली होती, या धोरणासाठी भारत महत्त्वाचा देश आहे. त्यामुळे आम्ही भारतासोबत घनिष्ठ संबंध निर्माण करण्याबाबत खूप गंभीर आहोत, असे ट्रूडो यांनी मॉन्ट्रियल येथे पत्रकार परिषदेत सांगितले. (India-Canada Issue)
कॅनडाच्या मॉन्ट्रियल येथे गुरुवारी एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले की, 'कॅनडा आणि त्याच्या मित्र राष्ट्रांसाठी भारतासोबतचे संबंध मजबूत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जगाच्या विविध व्यासपीठांवर भारताला महत्त्व दिले जात आहे. भारत ही एक वाढती आर्थिक शक्ती आहे आणि भू-राजकीयदृष्ट्याही खूप महत्त्वाची आहे. आमच्या हिंद पॅसिफिक महासागर धोरणासाठीही भारत महत्त्वाचा आहे. त्यामुळे भारतासोबतचे संबंध दृढ करण्याबाबत आम्ही खूप गंभीर आहोत, असे म्हणत कॅनडाने 'भारताची वाढती आर्थिक ताकद मान्य केले आहे.
जस्टिन ट्रूडो यांनी पुढे म्हटले की, त्याचवेळी कायद्याचे राज्य असलेला देश म्हणून भारताने कॅनडासोबत एकत्र काम करावे अशी आमची इच्छा आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन हे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान निज्जर यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करतील, असे आश्वासन अमेरिकेकडून मिळाल्याचे ट्रूडो यांनी सांगितले. अमेरिका आमच्यासोबत आहे आणि कॅनडाच्या भूमीवर एका कॅनडियन नागरिकाच्या हत्येचा मुद्दा भारतासोबत उचलत असल्याचे ट्रूडो म्हणाले.