Fairy circles in deserts: वाळवंटात वर्तुळाकार वलयांची निर्मिती; शास्त्रज्ञही चक्रावले | पुढारी

Fairy circles in deserts: वाळवंटात वर्तुळाकार वलयांची निर्मिती; शास्त्रज्ञही चक्रावले

पुढारी ऑनलाईन डेस्क: जगभरातील अनेक वाळवंटी भागात पोल्का-डॉट-शैली रचनेप्रमाणे वर्तुळाकार वलयांची निर्मिती होत असल्याचे संशाेधनात समाेर आले आहे. या रहस्यमय नैसर्गिक भौगोलिक रचना निर्मितीचे काय कारण असेल, या विचारात शास्त्रज्ञही पडले आहेत. ही अनोखी भौगोलिक रचनेची निर्मिती पाहून शास्त्रज्ञांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. 2014 मध्ये अशाप्रकारच्या वर्तुळाकार वलयांचा प्रथम शोध लागला हाेता. त्यानंतर जगभरातील अनेक वाळवंटी भागातच अशी भौगोलिक रचना आढळून आली असल्याचे वृत्त ‘इंडिया टुडे’ ने दिले आहे. (Fairy circles in deserts)

ऑस्ट्रेलिया आणि नामिबियामधील वाळवंटातील जमिनीवर वर्तुळाकार वलयही भौगोलिक रचना पुन्हा एकदा पाहिली गेली आहे. मात्र शास्त्रज्ञांनी हा काही तरी व्यापक आणि वेगळा प्रकार असल्याचे म्हटले आहे; परंतु ही नैसर्गिक निर्मिती का झाली असेल, यामागचे कारण मात्र शास्त्रज्ञांना अद्याप माहित नाही. वाळवंटात निर्माण होत असलेल्या या भौगोलिक रचनेसंदर्भात सध्या संशोधन सुरू असून, कोणतीही ठोस माहिती शास्त्रज्ञांच्या हाती लागलेली नाही.  (Fairy circles in deserts)

प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस (PNAS) या जर्नलमध्ये प्रकाशित नवीन संशोधनानुसार, जागतिक वाळंवटातील या नैसर्गिक निर्मितीला “फेयरी सर्कल” म्हणून ओळखले जात असल्याचा उल्लेख केला आहे. जगभरातील तीन खंडातील १५ देशांमध्ये अशाप्रकारच्या २६३ ज्ञात साइट्स आहेत. ज्याठिकाणी अशी नैसर्गिक रहस्यमय वर्तुळाकार झुडपांचे पॅच निर्माण झाले आहेत, असे देखील या जर्नलमध्ये म्हटले आहे. (Fairy circles in deserts)

जगभरातील नामिबिया, साहेल, मादागास्कर आणि मध्य-पश्चिम आशियामध्ये या वर्तुळाकार झुडपांचे पॅचचे (वलय) सर्वाधिक दर्शन झाले आहे. या नैसर्गिक निर्मितीने शास्त्रज्ञ अजूनही आश्चर्यचकित आहेत की, हे कसे तयार होतात? स्पेनमधील युनिव्हर्सिटी ऑफ एलिकॅन्टेचे शास्त्रज्ञ एमिलियो गुइराडो यांनी सांगितले की, आम्ही या वलयांचा जागतिक नकाशा तयार केला आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ एलिकॅन्टेचे शास्त्रज्ञ एमिलिओ यांच्या टीमने वेगवेगळ्या देशांतील या वलयांचा अभ्यास केला आहे. दरम्यान या निर्मितीच्या ठिकाणच्या पर्यावरण आणि जैव-भूगोलाकडे लक्ष दिले तर काही ठिकाणी वर्तुळाकार पॅचच्या कड्यांच्या काठावर एक विशेष प्रकारचे गवत उगवते, असे आढळून आले आहे. पण हे सर्व ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आढळून आले आहे. या कड्यांमधील क्षेत्र पूर्णपणे कोरडे असून, अशा प्रकारची नैसर्गिक भौगोलिक रचना सहसा वाळवंटी भागात दिसून आल्या आहेत.

Back to top button