गँगस्टर सुक्खाची कॅनडात हत्या | पुढारी

गँगस्टर सुक्खाची कॅनडात हत्या

नवी दिल्ली/टोरँटो, वृत्तसंस्था : खलिस्तान टायगर फोर्स (केटीएफ) चा दहशतवादी हरदीप निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडामधील तणाव विकोपाला गेला असतानाच आता कॅनडात गँगस्टर सुखदूल सिंह गिल ऊर्फ सुक्खा दुन्नेके याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने त्याच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. दरम्यान, जग्गू भगवानपुरीया गँगनेही आपणच त्याची हत्या केल्याचा दावा केला आहे.

सुक्खा हा ‘ए कॅटेगरी’ गँगस्टर 2017 मध्ये बनावट पासपोर्टच्या आधारे पंजाबमधून कॅनडात फरार झाला होता. प्राथमिक माहितीनुसार, सुक्खा दुन्नेकेवर कॅनडाच्या विनिपिगमध्ये गोळ्या झाडून मारण्यात आले. त्याच्यावर बंदुकीच्या सुमारे पंधरा फेर्‍या झाडण्यात आल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात सुक्खाचा जागीच मृत्यू झाला.

एनआयएने जारी केलेल्या 41 दहशतवादी आणि गँगस्टर्सच्या यादीतही त्याचा समावेश होता. कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येनंतरची ही दुसरी मोठी घटना आहे. गँगस्टर सुक्खाला खलिस्तानी दहशतवादी गँगस्टर अर्शदीप सिंह ऊर्फ अर्श डल्ला याचा उजवा हात मानला जात असे. अर्श डल्ला हा दहशतवादी हरदीप निज्जरचा जवळचा साथीदार होता. डल्ला त्याच्या साथीने ‘केटीएफ’च्या दहशतवादी कारवाया हाताळत होता.

पापांची शिक्षा मिळाली…लॉरेन्स गँग

लॉरेन्स गँगने गँगस्टर सुक्खा दुन्नेकेच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. या गँगने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, बंबीहा ग्रुपचा इन्चार्ज बनून फिरणार्‍या सुक्खा दुन्नेकेचा कॅनडातील विनिपेग शहरात खून झाला. त्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई ग्रुप घेत आहे. या हेरॉईन अ‍ॅडिक्टेड नशेबाजाने पैशासाठी अनेक घरे उजाड केली होती. आमच्या भाई गुरलाल बराड, विक्की मिझ्खेडाच्या खुनातही त्यानेच बाहेर बसून सर्व काही केले होते. संदीप नंगल अंबियाचा खूनही त्यानेच करवला होता. आता त्याला त्याच्या पापांची शिक्षा मिळाली आहे.

Back to top button