Aksai Chin : भारताच्या अक्साई चीनमध्ये चीनचे बोगदे! | पुढारी

Aksai Chin : भारताच्या अक्साई चीनमध्ये चीनचे बोगदे!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : 1962 च्या युद्धात चीनने बळकावलेल्या भारताच्या अक्साई चीन या भूभागामध्ये चीनने बोगद्यांचे काम सुरू केलेले असून, उपग्रहीय छायाचित्रांतून ही बाब समोर आली आहे. देप्सांगपासून 60 कि.मी. अंतरावर एका टेकडीतून चीन हे बोगदे काढत आहे. (Aksai Chin)

या भागावरील भारताचा दावा कायम आहे. लडाखमध्ये यापूर्वी संघर्षाची परिस्थिती उद्भवली आहे. त्यानंतर चीनच्या सीमेवरील आगळिकीला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही सज्जता केली. या सज्जतेला तोड देण्याचे प्रयत्न आता चीनकडून सुरू झालेले आहेत. सैनिकांसाठी आणि शस्त्रास्त्रांसाठी ऐनवेळचे बंकर म्हणून या बोगद्यांचा वापर चीनला अपेक्षित आहे. (Aksai Chin)

चीनकडून नदीच्या दोन्ही बाजूला 11 ठिकाणी असे बंकर बांधले जात आहेत. गेल्या काही महिन्यांत या ठिकाणी बांधकामला वेग आलेला आहे. भारताच्या संभाव्य हवाई हल्ल्यापासून आपली शस्त्रे आणि सैनिक सुरक्षित राहावेत, हा चीनचा हेतू आहे.

उपग्रहीय छायाचित्रांत 4 नवे बंकर

मॅक्सार टेक्नॉलॉजी या संस्थेने 18 ऑगस्ट रोजी टिपलेल्या उपग्रह प्रतिमांतून या भागात चीनने नवे 4 बंकर बांधल्याचे अधोरेखित होते. प्रत्येक ठिकाणी टेकड्यांतून बोगदे केलेले आहेत. अनेक ठिकाणी अवजड यंत्रसामग्रीही दिसत आहे. मध्यभागी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. थेट हल्ल्यांपासून बचाव व्हावा म्हणून बंकरभोवती मातीचे ढीग टाकण्यात आले आहेत. बंकरमधील प्रवेशाच्या आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी काटेरी कुंपण करण्यात आले आहे.

कोणत्याही क्षणी युद्धाची शक्यता गृहीत धरून भारतीय हवाई दलाने केलेल्या पूर्वतयारीला उत्तर म्हणून चीनने ही तयारी केली आहे. गलवान चीन-भारत हिंसक धुमश्चक्रीनंतर, भारतीय सैन्याने चीन सीमेवर तोफखान्याच्या अद्ययावतीकरणासह प्रत्याक्रमणाची सज्जताही वाढवली आहे. चीन अशा परिस्थितीत लपता यावे म्हणून अक्साई चीनमध्ये बिळे करून ठेवतो आहे, असे निरीक्षण सामरिक तज्ज्ञांनी नोंदविले आहे.

‘ड्रॅगन’चा माईंड गेम!

  • लडाखमधील लष्कराच्या कमांडरस्तरीय 19 व्या बैठकीत आपले सैन्य बफर झोनमधून माघारी घेण्याची तयारी चीनने दर्शविली होती.
  • दक्षिण आफ्रिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली, तेव्हाही जिनपिंग यांनी लडाखमधून सैन्य माघारीची तयारी दर्शविली होती.
  • भारतात होऊ घातलेल्या जी-20 परिषदेसाठी जिनपिंग भारत दौर्‍यावर येत आहेत. तत्पूर्वी, भारताचे अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश हे भाग आपल्या नकाशात दाखवून चीनने मुद्दामच भारताला चिथावलेले आहे.

हेही वाचा;

Back to top button