तालिबान-इस्लामिक स्टेटमध्ये जुंपली! | पुढारी

तालिबान-इस्लामिक स्टेटमध्ये जुंपली!

काबूल; वृत्तसंस्था : अफगाणिस्तानातील सत्ताधारी तालिबान मधील एक वरिष्ठ नेता हमदुल्लाह मुखलीस याची हत्या झाली आहे. तालिबान ने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदाच तालिबानच्या एखाद्या वरिष्ठ नेत्याची हत्या झाल्याची घटना तालिबानसाठी धक्‍कादायक मानली जाते. विशेष म्हणजे, मुखलीस हा तालिबानअंतर्गत एक स्वतंत्र अस्तित्व असलेल्या ‘हक्‍कानी नेटवर्क’चा सदस्य होता.

काबूलमधील रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात मुखलीसही मारला गेला आहे. हल्ल्याची जबाबदारी ‘इसिस’ने घेतली आहे. हमदुल्लाह मुखलीसची ‘बादरी स्पेशल फोर्सेस’मध्ये नियुक्‍ती करण्यात आली होती.

मंगळवारी सरदार मोहम्मद दाऊद खान लष्करी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर 2 बॉम्बस्फोट झाले. नंतर बेछूट गोळीबारही करण्यात आला. या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना तालिबानचा कमांडर हमदुल्लाह मुखलीस याचा खात्मा झाला.

‘इस्लामिक स्टेट’ने (‘इसिस’, खुरासान) रुग्णालयाजवळील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारताना म्हटले आहे की, इस्लामिक स्टेटच्या 5 योद्ध्यांनी हा हल्ला केला.

तालिबानचा प्रवक्‍ता जबिउल्लाह मुजाहिद याने ‘इसिस’ ही एक भ्याड संघटना असल्याची टीका केली आहे. रुग्णालयातील नागरिक, डॉक्टर, रुग्णांवर हल्ला करणे, हे केवळ अमानवीय कृत्य आहे, असेही मुजाहिद याने म्हटले आहे. ‘इसिस’च्या हल्ल्याला तालिबानी सैनिकांनी केवळ 15 मिनिटांतच चोख प्रत्युत्तर दिल्याचा दावाही मुजाहिदने केला आहे.

Back to top button