पुढारी ऑनलाईन डेस्क: तोशाखान भ्रष्टाचार प्रकरणी लाहोर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान व तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना मोठा दिलासा दिला. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने आज (दि.२९) यांच्या शिक्षेला स्थगिती दिली, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. तसेच त्यांची जामिनावर सुटका करण्याचे आदेशही दिले आहेत. या निकालामुळे इम्रान खान आगामी निवडणूक लढवू शकतील, असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहे. ( Imran Khan latest news )
तोशाखाना प्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी इम्रान खान यांना तीन वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली होती.या निकालाला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सोमवारी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.शिक्षेच्या स्थगितीची कारणे नंतर जारी करण्यात येणाऱ्या सविस्तर निकालात देऊ, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने आज (दि.२९) यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. तसेच त्यांची जामिनावर सुटका करण्याचे आदेशही दिले आहेत.
न्यायालयाने शिक्षेबाबत दिलेल्या निकालाने इम्रान खान यांचे राजकीय भवितव्य अंधारात टाकले होते. दोषी ठरल्यानंतर इम्रान खान यांना आगामी निवडणूक लढवण्यापासून रोखण्यात आले. पण, आता उच्च न्यायालयाने इम्रान खानच्या शिक्षेला स्थगिती देऊन त्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिल्यामुळे इम्रान खान निवडणूक लढवतील, असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत.
२०१८ मध्ये पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचे सरकार सत्तेवर आले. या काळात त्यांना अरब शासकांकडून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या. भेटवस्तूंमध्ये एक महागडी मनगटी घड्याळ, कफलिंकची एक जोडी, एक महागडा पेन, एक अंगठी आणि चार रोलेक्स घड्याळांचा समावेश होता. त्या तोशाखान्यात (देशातील गोदाम) जमा करण्यात आल्या. नंतर त्यांनी सवलतीच्या दरामध्ये त्या वस्तू विकत घेतल्या आणि मोठ्या नफ्यात त्याची विक्री करण्यात आली, असा आरोप विरोधी पक्षांनी इम्रान खान यांच्यावर केला होता.
इम्रान खान यांनी तोशाखान्यातून २.१५ कोटी रुपयांना विकत घेतल्या आणि त्याच विक्री करुन ५.८ कोटी रुपयांचा नफा कमावला, असा आरोप त्यांच्यावर होता. या भेटवस्तूंमध्ये एक ग्राफ घड्याळ, कफलिंकची एक जोडी, एक महागडा पेन, एक अंगठी आणि चार रोलेक्स घड्याळांचा समावेश होता. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी इम्रान यांनी सांगितले होते की, २१,५६ कोटी रुपये भरल्यानंतर राज्याच्या तिजोरीतून खरेदी केलेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून सुमारे ५८ लाख रुपये मिळाले होते. यामध्ये कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचा दावाही त्यांनी केला होता. या प्रकरणी २८ फेब्रुवारी रोजी सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते.