पुढारी ऑनलाईन डेस्क : वजन कमी केल्याचे किती तरी प्रेरणादायी अनुभव तुम्ही वाचले असतील. पण सौदी अरेबियातील खालिद बिन मोहसेन शारी या युवकाची गोष्ट मात्र पूर्ण वेगळी अशी आहे. खालिदचे वजन तब्बल ६१० किलो इतके होते, पण गेल्या ११ वर्षांत खालिदने ५४२ किलो वजन घटवत आता ६३ किलोवर वजन स्थिर ठेवलेले आहे. २०१३ खालिद हा जगातील सर्वांत लठ्ठ व्यक्ती ठरला होता. खालिदला वजन कमी करण्यात सौदी अरेबियाचे पूर्वाश्रमीचे राजे अब्दुल्लाह यांची मोलची मदत झाली आहे. Khalid Bin Mohsen Shaari
खालिदचे वजन तब्बल ६१० किलो असल्याचे आणि त्याला आरोग्याच्या विविध समस्या भेडसावत असल्याचे चर्चेत आले होते. खालिदची ही स्थिती राजे अब्दुल्लाह यांच्या कानावर पडली, त्यांनी खालिदवर योग्य ते उपचार करण्याचे आदेश दिले. खालिद त्या वेळी झाजन या गावी राहात होता. तेथून फोर्कलिफ्ट आणि खास बनवलेल्या बेडवरून त्याला रियाध येथील किंग फहाद मेडिकल सिटी येथे उपचारासाठी आणण्यात आले, असे इकॉनॉमिक टाइम्सच्या बातमीत म्हटले आहे.
खालिदची आधी गॅस्ट्रिक बायपास सर्जरी करण्यात आली. त्यानंतर व्यायाम, काटेकोर डाएट प्लॅन, फिजओथेरपीच्या मदतीने पहिल्या सहा महिन्यात खालिदने बरेच वजन कमी केले. तसेच २०२३पर्यंत त्याने वजन ६३ किलो इतके कमी केले. पण इतक्या मोठ्या प्रमाणवर वजन कमी केल्याने खालिदच्या शरीरावर जादा त्वचा राहिली होती, ती शस्त्रक्रियेने कमी करण्यात आली.
खालिद लठ्ठ असताना त्याच्या सर्व शारीरिक हालचालींसाठी कुटुंबावर अवलंबून होता, पण आता त्याचे हे अवलंबित्व कमी झाली आहे. (Khalid Bin Mohsen Shaari)