पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत देणार गरीब देशांना पाच अब्ज डोस | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत देणार गरीब देशांना पाच अब्ज डोस

रोम; वृत्तसंस्था : भारत आगामी वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचे पाच अब्ज डोस तयार करेल आणि हे डोस संपूर्ण जगासाठी असतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 परिषदेच्या दुसर्‍या दिवशी रविवारी रोम येथे केली. अमेरिका, ब्रिटनसह अनेक विकसित देशांनीही यावेळी गरीब देशांना डोस पुरविण्यासाठी लस उत्पादन वाढवण्याची तयारी दर्शवली.

जी-20 सदस्य देशांनी भारतात विकसित करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी मिळावी म्हणून मदत करण्याचे आवाहन यावेळी मोदींनी केले. कोव्हॅक्सिनला मंजुरी मिळाल्यास गरीब देशांसाठी 5 अब्ज लस उत्पादनाचे आपले उद्दिष्ट भारत सहजगत्या पूर्ण करू शकेल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी जागतिक नेत्यांना भारताने कोरोनाकाळात जगाला केलेल्या वैद्यकीय पुरवठ्याबाबत माहिती दिली. कोरोनाच्या सुरुवातीपासून ते आजपर्यंत भारताने 150 देशांना वैद्यकीय साहित्याचा पुरवठा केला असल्याचे त्यांनी सांगितले.

परिषदेचे दुसरे सत्र जल-वायू परिवर्तन आणि पर्यावरणावर आधारलेले होते. वाढत्या जागतिक तापमानावर त्यात चिंता व्यक्त करण्यात आली व ते कमी करण्याचा संकल्प सोडण्यात आला. रविवारी मोदी अन्य नेत्यांसह रोममधील प्रसिद्ध ट्रेवी कारंजा पाहण्यासाठी गेले. येथे त्यांनी अन्य नेत्यांसह नाणेही फेकले. येथे तशी परंपरा आहे.

मोदी ग्लासगोकडे

आता मोदी इटलीहून ब्रिटनमधील ग्लासगोसाठी रवाना होतील. जल-वायू परिवर्तनाविषयी संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीत 26 वी परिषद ग्लासगोमध्ये होणार आहे.

Back to top button