Putin appoint new Wagner chief : बंडोबाचा थंडोबा, आता खेळखंडोबा!

मॉस्को, वृत्तसंस्था : रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना पदच्युत करण्याचा प्रयत्न करणारे वॅगनर लष्करी या खासगी कंपनीचे प्रमुख येवगेनी प्रिगोझीन अज्ञातवासातच आहेत. त्यांच्याबद्दलची कुठलीही माहिती सध्या उपलब्ध नाही. वॅगनर खालसा करून या कंपनीच्या प्रमुखपदी आता रशियन सरकारी लष्करातून निवृत्त कर्नल आंद्रेई ट्रोशेव्ह यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
माजी अमेरिकन जनरल रॉबर्ट अब्राहम यांच्या मते, प्रिगोझीन आता पुन्हा कधीही, कुणालाही दिसणार नाहीत. अब्राहम म्हणतात, पुतीन यांना किरकोळ विरोध करणार्या विरोधकांच्याही हत्या झालेल्या आहेत. प्रिगोझीनने तर थेट पुतीन यांच्या सत्तेलाच आव्हान दिले होते.
सत्तापालटाच्या प्रिगोझीन यांच्या प्रयत्नानंतर पाचच दिवसांनी पुतीन यांनी तशी फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती. वॅगनरमधील अनेक उच्चपदस्थांशीही ते बोललेले आहेत. रशियन माध्यमांच्या माहितीनुसार, वॅगनरचे नवीन प्रमुख म्हणून निवृत्त कर्नल आंद्रेई ट्रोशेव्ह यांचे नाव पुतीन यांनी सुचवले आहे.