नरेंद्र मोदी यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार | पुढारी

नरेंद्र मोदी यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

पॅरिस, वृत्तसंस्था : फ्रान्स सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ग्रँड क्रॉस ऑफ लिजन ऑफ ऑनर’ या सर्वोच्च नागरी आणि लष्करी पुरस्काराने सन्मानित केले. हा पुरस्कार मिळविणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.

बॅस्टिल डे परेडमध्ये मोदी यांना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी हा पुरस्कार बहाल केला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार मी नम्रपणे स्वीकारतो. हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान आहे. भारतावर फ्रान्सचे असणारे प्रेम या पुरस्कारातून दिसून आले आहे. त्यामुळे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, फ्रान्स सरकार आणि फ्रान्सचे लोक यांचे मी मनापासून आभार मानतो. याआधीही मी फ्रान्सला भेट दिली आहे. मात्र, ही भेट अविस्मरणीय ठरेल. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे यापुढील काळातही दोन्ही देशांंमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यावर जोर दिला जाईल, असेही मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी फ्रान्स दौर्‍यावर रवाना झाले आहे. पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न यांनी त्यांचे गुरुवारी शाही स्वागत केले. दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला, प्रिन्स ऑफ वेल्सचे किंग चार्ल्स, जर्मनीच्या माजी चॅन्सलर अँजेला मर्केल, युनोचे माजी सरचिटणीस बुट्रोस घाली यांनाही याआधी फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Back to top button