बीजिंग/वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : सध्याच्या जगाची लाईफलाईन बनलेल्या शुद्ध (प्रक्रियाकृत) लिथियम आणि कोबाल्ट या खनिजांच्या निर्यातीवर चीनने बंदी घातली आहे. अमेरिकेसह भारतासोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान चीनने हा निर्णय घेतला आहे. गॅलियम तसेच जर्मेनियमच्या निर्यातीवर याआधीच चीनने बंदी घातली आहे. चीनच्या या निर्णयाकडे अमेरिकेसह अवघ्या जगाला दिलेली धमकी म्हणून पाहिले जात आहे. अमेरिका आपल्या एकूण गरजेपैकी लिथियमसारख्या रेअर खनिजांची 78 टक्के आयात एकट्या चीनमधून करते, हे येथे उल्लेखनीय!
बहुतांश खनिजे ड्रॅगनचाच खजिना!
ज्या खनिजांचे उत्पादन चीनमध्ये होत नाही, त्या खनिजांवरील प्रक्रियाही बहुतांशी चीनमध्येच होते.
उदा. जस्त या धातूवर चीनचे नियंत्रण आहे. इंडोनेशिया आणि पापुआ न्यू गिनीसारख्या देशांतूनही जस्ताचे उत्पादन होत असले तरी त्यावरील प्रक्रिया चिनी कंपन्यांकडूनच केली जाते.
लिथियम, कोबाल्ट हे लाईफलाईन का?
लिथियम व कोबाल्ट या दोन्ही खनिजांचा वापर सेमिकंडक्टर्स, सौर पॅनल आणि क्षेपणास्त्र यंत्रणेत केला जातो, हे येथे महत्त्वाचे!
पेट्रोल, डिझेल वाहनांना पर्याय म्हणून समोर आलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वाहनांच्या बॅटर्यांमध्ये लिथियम वापरले जाते. टचस्क्रिन मोबाईलमध्येही ही खनिजे वापरली जातात.
* गॅलियम, जर्मेनियम बंदी पाठोपाठ लिथियम, कोबाल्ट निर्यातीवरही बंदीचा निर्णय
* इलेक्ट्रॉनिक वाहनांसह, संरक्षण सामग्री, मोबाईल फोन उद्योगाला बसणार फटका