पुढारी ऑनलाईन डेस्क : मेक्सिकोत प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळल्याने सुमारे २७ जणांचा मृत्यू झाला. तर २१ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी १२ जणांची प्रकृती गंभीर आहे, असे ओक्साकाचे गृहमंत्री जीसस रोमेरो यांनी सांगितले. मेक्सिकोच्या दक्षिणेकडील ओक्साका प्रांतात बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली. ओक्साकाच्या राज्यपालांनी ट्विट करून या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, प्रवाशांनी भरलेली बस बुधवारी मेक्सिको सिटीहून योसुंडुआला जात होती. यादरम्यान मॅग्डालेना पेनास्को शहरात सकाळी बस खोल दरीत पडली. त्लाक्सियाओ सिव्हिल प्रोटेक्शन कर्मचाऱ्यांनी जखमींना रुग्णालयात नेले. मृतांमध्ये एक वर्षाच्या बाळासह १३ महिला आणि १३ पुरुषांचा समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ओक्साकाचे गव्हर्नर सॉलोमन यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. राज्यपालांनी विविध यंत्रणांना पीडितांना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यपालांनी ट्विट करून सरकार, आरोग्य, सार्वजनिक सुरक्षा, कल्याण आणि इतर विभागांच्या सचिवांना सूचना दिल्या आहेत.