अखेर ‘त्या’ पाचही जणांना मृत्यूने गाठलेच | पुढारी

अखेर ‘त्या’ पाचही जणांना मृत्यूने गाठलेच

वॉशिंग्टन ः वृत्तसंस्था अटलांटिक महासागरात टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी पाच अब्जाधीशांना घेऊन गेलेली टायटन ही बेपत्ता झालेली पाणबुडी स्फोटात नष्ट झाली असून त्यात पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या नौदल अधिकार्‍यांना या पाणबुडीचे काही अवशेष सापडले आहेत.

नौदलाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणबुडीचा काही दिवसांपूर्वीच स्फोट झाल्याचे आढळून आले आहे. अटलांटिक महासागरात टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेली टायटन पाणबुडी रविवारी बेपत्ता झाली होती. यानंतर लगेचच अमेरिका आणि कॅनडा या दोन्ही देशांच्या नौदलांकडून शोधकार्य सुरू करण्यात आले होते. यूएसए टुडेने दिलेल्या वृत्तानुसार 22 फूट लांबीच्या टायटन पाणबुडीचे अवशेष बचाव पथकांना टायटॅनिकच्या अवशेषांच्या जवळच सापडले. पाणबुडीतील पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती या मोहिमेचे नेतृत्व करणार्‍या ओशनगेट कंपनीने दिली आहे.

अवशेष समुद्राच्या तळाशी

टायटॅनिकच्या जहाजाच्या अवशेषांपासून सुमारे 1600 फूट अंतरावर समुद्राच्या तळावर बेपत्ता पाणबुडीचे अवशेष सापडले आहेत. पाणबुडीच्या प्रेशर चेंबरमध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत सखोल तपासानंतरच नेमके कारण समोर येणार आहे. किनारारक्षक दलाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, पाणबुडीचा स्फोट नेमका कधी झाला हे सांगणे सध्या कठीण आहे. अमेरिकेच्या किनारारक्षक दलाचे रिअर अ‍ॅडमिरल जॉन मॅगर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली
आहे.

ओशनगेटचे सीईओही बेपत्ता पाणबुडीत

अपघातग्रस्त टायटन पाणबुडीमध्ये ओशनगेटचे संस्थापक आणि सीईओ स्टॉकटन रश, ब्रिटिश अब्जाधीश हॅमिश हार्डिंग, प्रसिद्ध फ्रेंच डायव्हर पॉल-हेन्री नार्गोलेट, मूळचे पाकिस्तानी आणि ब्रिटनमध्ये वास्तव्याला असलेले व्यापारी शहजादा दाऊद आणि त्याचा 19 वर्षांचा मुलगा सुलेमान हे पाच जण होते. तब्बल अडीच लाख डॉलर्स यातील प्रत्येकाने या साहसी पर्यटन मोहिमेसाठी मोजले होते.
ओशनगेट कंपनीने म्हटले आहे की, प्रत्येक प्रवाशाच्या कुटुंबासाठी ही अत्यंत दुःखद बातमी आहे. ही पाणबुडी शोधण्यासाठी अमेरिका व कॅनडा यांनी आपल्या सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर केल्याची माहिती अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी वॉल स्ट्रीट जर्नलला दिली आहे.

सुलेमानने दिला होता नकार

ब्रिटनमध्ये वास्तव्याला असलेले मूळचे पाकिस्तानी व्यापारी शहजादा दाऊद यांचा मुलगा सुलेमान हा या मोहिमेआधीच घाबरला होता, असा खुलासा त्याच्या मावशीने केला आहे. मात्र त्याच्या टायटॅनिकप्रेमी वडिलांसाठी ही मोहीम महत्त्वाची असल्यामुळे तो मोहिमेवर जाण्यास नाईलाजाने तयार झाला होता. आधी त्याने जवळपास नकारच दिला होता. विशेष म्हणजे खुद्द शहजादा दाऊद हेही 2019 मध्ये एका भयावह विमान अपघातातून बालंबाल बचावले होते.

Back to top button