इस्लामाबाद, वृत्तसंस्था : पाकिस्तानची अर्थव्यवस्था पुरती रसातळाला गेल्याने पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पुन्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (आयएमएफ) झोळी पसरली आहे. आयएमएफकडून मात्र पाकला मदत मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था बिकट झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तानने आंतराष्ट्रीय नाणेनिधीचे उंबरठे अनेकदा झिझवले आहेत. फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी आंतरराष्ट्रीय वित्तीय कराराबाबत आजपासून बैठक सुरू आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पाकचे पंतप्रधान शरीफ यांनी आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक ख्रिश्टालिना जॉजिव्हा यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून बेल आऊटची मागणी केली. याशिवाय अलीकडच्या काळात शरीफ यांनी आएएमएफशी तीन वेळा पत्रव्यवहार केला आहे.
पाकला साधारण 6.7 अब्ज डॉलर्स एवढ्या अर्थसहाय्याची तातडीची गरज आहे. याआधीही पाकने अनेकवळा आयएमएफचे दरवाजे ठोठावले होते. आधी दिलेल्या कर्जाची नीट परतफेड न केल्याने आयएमएफ ने पाकचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. या पार्श्वभूमीवर पाकच्या अर्थमंत्री डॉ. आयेश पाशा म्हणाल्या की, पाकने आयएमएफकडे कर्जाची मागणी केली आहे.
कर्जाची पुनर्रचना करून काही प्रमाणात तरी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती केली आहे. आएमएफने याआधी असर्मथता दर्शविली होती. या खेपेसही मागणी मान्य झाल्यास पाठपुरावा करण्याशिवाय आमच्या हाती काहीही नाही, अशी असमर्थता त्यांनी दर्शविली. पाकच्या बेलआऊटबाबत निर्णय घेण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत आहे.