कर्नाटकसारखीच तेलंगणासह इतरत्र काँग्रेस भाजपला धूळ चारेल : राहुल गांधी | पुढारी

कर्नाटकसारखीच तेलंगणासह इतरत्र काँग्रेस भाजपला धूळ चारेल : राहुल गांधी

न्यूयॉर्क;  वृत्तसंस्था :  कर्नाटकातील विजयानंतर काँग्रेस तेलंगणा आणि इतर राज्यांतही भाजपला धूळ चारेल, असा विश्वास काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला. काँग्रेस पक्षच नव्हे तर भारतातील नागरिकच द्वेषयुक्त विचारधारेला मूठमाती देतील, असेही ते म्हणाले.

सॅनफ्रान्सिस्को आणि वॉशिंग्टनच्या दौर्‍यानंतर न्यूयॉर्कमध्ये राहुल गांधी दाखल झाले. मॅनहटनमधील जाव्हिटास सेंटरमध्ये इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या वतीने आयोजित मेजवानीत बोलताना ते म्हणाले की, कर्नाटकात भाजपने निवडणुका जिंकण्यासाठी उपलब्ध ते सर्व मार्ग हाताळले होते. त्यांच्याकडे माध्यमे होती, काँग्रेसपेक्षा 10 पटींनी अधिक पैसे होते, सरकार होते, सरकारी तपास संस्था होत्या. हे सारे असताना त्यांना काँग्रेसने धूळ चारली. त्यांना आगामी काळात तेलंगणा आणि इतर राज्यांतही धूळ चारू. यावेळी निवडणुकीनंतर तेलंगणात भाजप शोधणे मुश्कील होईल, असेही ते म्हणाले. न्यूयॉर्कचे महापौर एरिक अ‍ॅडम्स हेही उपस्थित होते.

अ‍ॅडम्स म्हणाले की, भारतीय समुदाय हा उच्चशिक्षित, उद्योग व व्यावसायिक जगात स्थान निर्माण करणार आहे. तुम्ही अमेरिकेला कर्मभूमी म्हणून स्वीकारले असले तरी मातृभूमीला विसरू नका. या मेजवानीच्या कार्यक्रमाला भारतीय समुदायाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रुझवेल्ट यांच्या घराला भेट

त्याआधी राहुल गांधी यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट यांच्या घराला भेट दिली. तेथे त्यांनी विचारवंतांच्या एका गटाशी चर्चा केली. ते म्हणाले की, भारतात दोन विचारधारांची लढाई सुरू आहे. तशीच ती अमेरिकेतही सुरू आहे. एक विचारधारा आमची आहे जी सर्वांना सोबत घेणारी, सर्वांचा आदर करणारी आहे. दुसरी विचारधारा भाजपची आहे. त्यांचे देशाबद्दलचे आकलन खूप संकुचित आहे.

Back to top button