विमान 700 फूट उंचीवर होते, त्याने उघडला दरवाजा आणि… | पुढारी

विमान 700 फूट उंचीवर होते, त्याने उघडला दरवाजा आणि...

सेऊल, वृत्तसंस्था : अचानकपणे त्याने विमानाचा दरवाजा उघडला आणि जणू हलकल्लोळ माजला. दक्षिण कोरियातील एशियाना एअरलाइन्सच्या विमानातील घटना एखाद्या चित्रपटातील प्रसंगासारखीच. झाले असे की, एका प्रवाशाने विमान हवेत असतानाच आपत्कालीन दरवाजा उघडला. विशेष म्हणजे तेव्हा विमान उतरायला केवळ दोन मिनिटे बाकी होती आणि विमान तेव्हा होते तब्बल 700 फूट उंचीवर. शुक्रवारी ही थरारक घटना घडली. यादरम्यान 12 प्रवासी जखमी झाले आहेत.

दरवाजा उघडणार्‍या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. या विमानात 6 क्रू मेंबर्स आणि 194 प्रवासी होते. एका प्रवाशाने सांगितले, दरवाजा उघडल्यानंतर विमानात स्फोट होणार असल्यासारखे वाटू लागले होते. दाराजवळ बसलेले प्रवासी बेशुद्ध पडू लागले. विमानात लहान मुलेही होती. ती रडत होती आणि त्यातील काही भीतीने थरथरत होती. विशेष म्हणजे अटक केलेला प्रवासी विमानातून उडी मारण्याच्या तयारीत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

Back to top button