पंतप्रधान मोदींच्‍या भेटीपूर्वी सिडनी हार्बर आणि ऑपेरा हाऊस परिसर तिरंग्‍याने उजळला | पुढारी

पंतप्रधान मोदींच्‍या भेटीपूर्वी सिडनी हार्बर आणि ऑपेरा हाऊस परिसर तिरंग्‍याने उजळला

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्‍ट्रेलिया दौर्‍यावर आहेत. आज (दि.२४) ते सिडनी येथे भेट देण्‍यापूर्वी सिडनी हार्बर आणि ऑपेरा हाऊस तिरंग्‍याने उजळला आहे. ( PM Modi Sydney visit )

पीएम मोदींकडून ऑस्ट्रेलियातील मंदिरांवरील हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तीन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आज ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर झालेल्या हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Prime Minister Anthony Albanese) यांनी, ”भविष्यात अशा घटकांवर कडक कारवाई करू,” असे आश्वासन दिल्याचे पीएम मोदी यांनी म्हटले आहे. पीएम मोदी यांनी बुधवारी सिडनी येथे अँथनी अल्बानीज यांच्याशी या मुद्यावर द्विपक्षीय चर्चा केली. (PM Modi in sydney)

अल्बानीज यांच्यासोबत संयुक्त निवेदन सादर करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि मी ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर झालेले हल्ले आणि फुटीरतावादी घटकांच्या कारवायांवर यापूर्वीही चर्चा केली होती. आम्ही आजही या विषयावर चर्चा केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचे द्विपक्षीय संबंध मैत्रीपूर्ण आहेत. या संबंधांना बाधा पोहोचवणारी काही घटकांची कृती आम्ही सहन करणार नाही. पंतप्रधान अल्बानीज यांनी आज पुन्हा एकदा आश्वासन दिले की ते भविष्यातही अशा घटकांवर कठोर कारवाई करतील.
ऑस्ट्रेलियाच्या अनेक भागांमध्ये अलीकडेच खलिस्तानी समर्थक आणि भारत समर्थक निदर्शकांमधील संघर्षाची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ऑस्ट्रेलियात नुकत्याच भारतीय झेंडे जाळण्याचे आणि एका हिंदू मंदिराचीही तोडफोड करण्याच्या घटना घडल्या आहेत.
यापूर्वी अल्बानीज यांनी मार्चमध्ये त्यांच्या भारत भेटीदरम्यान सांगितले होते की ऑस्ट्रेलिया धार्मिक स्थळांवर होणारे हल्ले सहन करणार नाही आणि हिंदू मंदिरांवरील हल्ले रोखले जातील.

पंतप्रधान मोदींना दिलेल्या आश्वासनाबाबत माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना अल्बानीज म्हणाले, “मी त्यांना आश्वासन दिले की ऑस्ट्रेलिया हा लोकांच्या श्रद्धेचा आदर करणारा देश आहे. धार्मिक स्थळांवरील हल्ले मग ती हिंदू मंदिरे, मशिदी आणि चर्च असोत आम्ही अशा प्रकारची टोकाची कृती आणि हल्ले सहन करणार नाही. ऑस्ट्रेलियात याला स्थान नाही.”

Back to top button