पाकिस्तानात लष्कर-इम्रान यांच्यात संघर्ष उफाळला | पुढारी

पाकिस्तानात लष्कर-इम्रान यांच्यात संघर्ष उफाळला

इस्लामाबाद, वृत्तसंस्था : भारताविरुद्ध कोणतेही दहशतवादी कृत्य केले जाणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेण्याचे आदेश माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांच्या कार्यकाळात लष्कराला दिल्याचा गौप्यस्फोट गुरुवारी (दि. 18) रात्री उशिरा इम्रान खान यांच्या तहरिक-ए-इन्साफ पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केला. पाठोपाठ त्याचे जोरदार पडसाद पाकिस्तानातील लष्करी वर्तुळात उमटले आहेत. त्यामुळे इम्रान खान आणि लष्कर यांच्यात तीव्र संघर्ष उफाळला आहे. या पार्श्वभूमीवर, पाकमध्ये येत्या काही दिवसांत आणखी स्फोटक घटना घडल्या, तर आश्चर्य वाटू नये.

सर्वशक्तिमान लष्कराशीच पंगा घेतल्यामुळे इम्रान खान यांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. भारताविरुद्धच्या दहशतवादी कारवायांत थेट पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याचे इम्रान यांच्या ट्विटमुळे पुरेसे स्पष्ट झाल्यामुळे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि काही ज्येष्ठ अधिकार्‍यांचा तिळपापड झाला आहे.

9 मे रोजी पाकिस्तानात इम्रान खान यांच्या अटकेवरून अभूतपूर्व हिंसाचार उसळला होता. त्यानंतर लष्करप्रमुख मुनीर यांनी या हिंसाचारातील कोणाचाही गय केली जाणार नाही, असा इशारा दिला होता. पाठोपाठ सियालकोट येथे लष्करप्रमुख मुनीर यांच्या नेतृत्वाखाली बंद दाराआड वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांची बैठक पार पडली. या बैठकीतही मुनीर यांचा सूर टिपेला पोहोचला होता. त्यांनी लष्करावर टीका करणार्‍या सगळ्यांच्या पत्नी आणि मुलांनाही आम्ही सोडणार नाही, असा इशारा दिला आहे.

इम्रान खान यांच्यावर तर ते आधीच व्यक्तिशः संतापले आहेत. तशातच इम्रान यांनी लष्कराची उघडपणे बेअब्रू केल्यामुळे मुनीर हे इम्रान यांना धडा शिकवण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. कारण, भारतातील दहशतवादी कारवायांना पाकिस्तानी लष्कराची फुस असते ते हे उघड गुपीत असले, तरी त्याचा असा जाहीर उच्चार यापूर्वी कधीच एवढ्या उघडपणे झाला नव्हता. इम्रान हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान असल्यामुळे त्यांनी केलेल्या या विधानाला आंतरराष्ट्रीय पातळीवरही विशेष महत्त्व दिले जात आहे.

Back to top button