

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या निवासस्थानावर कोणत्याही क्षणी सुरक्षा दल छापा टाकू शकते. पंजाब प्रांताच्या काळजीवाहू सरकारने इम्रान खान यांच्या जमान पार्कमधील निवासस्थानात ४० दहशतवादी लपल्याचा दावा केला हाेता. तसेच या दहशतवाद्यांना २४ तासांमध्ये सुरक्षा दलांच्या स्वाधीन करावे, असा अल्टीमेटम देण्यात आला होता. तो आता गुरुवारी दुपारी 2 वाजता संपला असून इम्रान खान यांच्या निवासस्थानावर कोणत्याही क्षणी सुरक्षा दल छापा टाकू शकते, असे मानले जात आहे. या कारवाईसाठी पोलीस, रेंजर्स आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने कारवाईची तयारी पूर्ण केली आहे. तर इम्रान खान यांनी माध्यमांना घरी निमंत्रण दिले आहे. ( Pakistan News Updates )
इम्रान खान यांना आज नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने (एनएबी) अल कादिर ट्रस्ट प्रकरणात चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. मात्र ते गैरहजर राहिले, असे वृत्त पाकिस्तानी 'द डॉन' दैनिकाने दिले आहे. इम्रान खान यांच्या कायदेशीर टीमने त्यांना एनएबीला लेखी उत्तर सादर करण्याचा सल्ला दिला आहे.
अल कादिर ट्रस्ट प्रकरणात ६० अब्ज पाकिस्तानी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. इम्रान खान, त्यांची पत्नी बुशरा बीबी आणि बुशरा यांची मैत्रीण फराह गोगी या शैक्षणिक ट्रस्टचे विश्वस्त आहेत. ब्रिटीश सरकारची कागदपत्रेही तपास यंत्रणेकडे उपलब्ध आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानला ४० अब्ज रुपये पाठवल्याचा उल्लेख असल्याचे सरकारच्या सूत्रांनी म्हटले आहे.
पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, "आमच्याकडे सर्व तांत्रिक पुरावे आहेत. ८ मे रोजी खैबर पख्तूनख्वामधील सुमारे ८८ लोकांना जमान पार्कमध्ये आणण्यात आले. या लोकांनी ९ मे रोजी जिना हाऊस, लष्कराचे मुख्यालय आणि आयएसआय मुख्यालयावर हल्ला केला. या लोकांची ओळख पटल्यानंतर मोबाईल ट्रेस करण्यात आले. जमन पार्कमध्ये जागा मिळाली. एकतर खान यांनाच त्यांच्या स्वाधीन करावे किंवा सुरक्षा दल त्यांचे काम करतील. राणा पुढे म्हणाले- या ४० दहशतवाद्यांना इम्रान खान पंतप्रधान असताना मुक्त करण्यात आले होते. ते तालिबानशी संबंधित आहे. इम्रान खान आता त्यांचा वापर सुरक्षा दलांविरुद्ध करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
इम्रान खान यांच्या पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय)चे ज्येष्ठ नेते, माजी कॅबिनेट मंत्री आणि खान यांचे विशेष सल्लागार मलिक अमीन अस्लम यांनी पक्ष सोडला आहे. अस्लम पत्रकार परिषदेत म्हणाले की, देश तोडणाऱ्या अजेंड्यासह राहणे आता अशक्य आहे. मलिक हे पीटीआय वर्किंग कमिटीचे अध्यक्ष होते. आतापर्यंत एकूण 6 ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
हेही वाचा :