Cyclone Mocha Update : ‘मोचा’ चक्रीवादळ बांग्लादेशच्या किनारीपट्टीला धडकण्यास सुरुवात | पुढारी

Cyclone Mocha Update : 'मोचा' चक्रीवादळ बांग्लादेशच्या किनारीपट्टीला धडकण्यास सुरुवात

पुढारी ऑनलाईन: ‘मोचा’ हे चक्रीवादळ अतिशय तीव्र झाले असून, ते बांग्लादेशच्या किनारीपट्टीलगतच्या चितगाव, बारिशाल किनारी भागात धडकण्यास सुरुवात झाली आहे. हे चक्रीवादळ गेल्या ६ तासांत १५ कि.मी. प्रतितास वेगाने पुढे सरकत असून, १४ मे रोजी दुपारी बांगलादेशातील कॉक्स बाजार आणि म्यानमारमधील क्युकप्यू भाग ओलांडेल (Cyclone Mocha Update), अशी शक्यता असल्याची माहिती बांग्लादेश हवामान विभागाने दिल्याचे वृत्त ढाका ट्रिब्यूने दिले आहे.

बांग्लादेश हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (Cyclone Mocha Update), मोचा चक्रीवादळ बांगलादेश आणि म्यानमारच्या किनारी भागाकडे २१० किमी/तास वेगाने वाऱ्यासह पुढे सरकत आहे. मोचा हे चक्रीवादळ मध्यरात्री चट्टोग्राम बंदराच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे ४९० किलोमीटर, कॉक्स बाजार बंदरापासून ४१० किलोमीटर दक्षिण-नैऋत्य, मोंग्ला बंदराच्या दक्षिणेला ५३० किलोमीटर आणि पेरा पोर्टच्या दक्षिण-पश्चिम ४६० किलोमीटर अंतरावर होते, अशी माहिती देखील ढाका ट्रिब्यूनने दिली आहे.

मोचा हे चक्रीवादळ हळूहळू आणखी तीव्र होत आहे. या चक्रीवादळाची वाटचाल उत्तर-वायव्य दिशेने चालू (Cyclone Mocha Update)) राहील. आज (दि.१४) सकाळी ९ ते दुपारी ३ च्या दरम्यान मोचा चक्रीवादळ कॉक्स बाजार-उत्तर म्यानमारचा किनारा ओलांडेल, असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे.

Cyclone Mocha Update: किनारपट्टीवर संरक्षण पथके तैनात

चक्रीवादळ पुढे म्यानमारच्या दिशेने सरकत असून, बांग्लादेशच्या किनारपट्टीला धोका पोहोचण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा बख्खली किनारपट्टीवर (‘Mocha’ cyclone) संरक्षण पथके तैनात करण्यात आली आहेत. ‘मोचा’ चक्रीवादळ तीव्र होण्याचा इशारा दिल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाने (NDRF) पश्चिम बंगालच्या दिघामध्ये ८ टीम आणि २०० बचावकर्ते तैनात केले आहेत.

‘मोचा’ दोन दशकांतील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ

चक्रीवादळ मोचा हे जवळपास दोन दशकांत बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकणारं सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ आहे, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. बांग्लादेशच्या हवामान विभागाचे प्रमुख अजीजुर रहमान यांनी एएफपीला सांगितले की, “चक्रीवादळ मोचा हे चक्रीवादळ ‘सिद्र’ या चक्रीवादळानंतरचे सर्वात शक्तिशाली वादळ आहे.”

Back to top button