पाकिस्तानात यादवी! हिंसाचारात 8 ठार; लष्करावर पहिल्यांदाच लोकांचे हल्ले | पुढारी

पाकिस्तानात यादवी! हिंसाचारात 8 ठार; लष्करावर पहिल्यांदाच लोकांचे हल्ले

इस्लामाबाद; वृत्तसंस्था :  माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर दुसर्‍या दिवशी बुधवारीही पाकिस्तानात हिंसाचार सुरूच होता. पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या इम्रान यांच्या पक्षाच्या समर्थकांनी इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी, कराची, क्वेटा, फैजलाबादसह अनेक शहरांतून जाळपोळ आणि तोडफोड केली. लष्करी कार्यालये तसेच लष्करी अधिकार्‍यांची घरे लोकांच्या निशाण्यावर होती. तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या एक हजार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयावर लोकांनी हल्ला केला. ‘आयएसआय’च्या मुख्यालयालगतही जाळपोळ केली. पेशावर, फैजलाबाद, क्वेटा येथे लष्करी वाहने जाळली. कराचीत पोलिसांचे वाहन पेटवून दिले. लाहोरमध्ये एका लष्करी कमांडरच्या घरात नासधूस केली.
हिंसाचारात आतापर्यंत ठिकठिकाणी 8 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या हिंसाचारात 5 अधिकारीही जखमी झाले आहेत.

इम्रान समर्थक 43 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे, असे इस्लामाबाद पोलिसांनी सांगितले. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बुधवारी देशभरातील खासगी शाळा बंद होत्या. क्वेटा येथील हिंसाचारात ‘पीटीआय’च्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याचे या पक्षाचे एक नेते कासीम सुरी यांनी सांगितले.

Back to top button