इम्रान खान यांच्‍या अडचणीत वाढ, तोशाखाना प्रकरणी आरोप निश्‍चित, ‘अल-कादिर’ प्रकरणी आदेश न्‍यायालयाने ठेवला राखून | पुढारी

इम्रान खान यांच्‍या अडचणीत वाढ, तोशाखाना प्रकरणी आरोप निश्‍चित, 'अल-कादिर' प्रकरणी आदेश न्‍यायालयाने ठेवला राखून

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे प्रमुख इम्रान खान यांचा भोवतीचा कायद्याचा फास आता आणखी आवळला आहे. आज ( दि. १० ) बुधवारी इस्लामाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयाने तोशाखाना प्रकरणी त्यांच्यावर आरोप निश्चित केले आहेत. तर दुसरीकडे, अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात भ्रष्टाचारविरोधी एजन्सी NAB च्या याचिकेवर निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. दरम्‍यान, NAB न्‍यायालयाने  इम्रान खान यांना आठ दिवस नजरकैदेत ठेवण्‍याचे आदेश दिले आहेत.

इम्रान खान यांची अटक कायदेशीरच : नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो

अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात पाकिस्‍तानमधील नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोच्या (NAB ) आदेशानुसार, इम्रान खान यांना अटक झाली होती. यानंतर त्यांना रावळपिंडी येथील कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले. नंतर, इस्लामाबाद उच्च न्यायालयाने मंगळवारी रात्री खानच्या अटकेवर शिक्कामोर्तब केले. अटकेदरम्यान सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्या असर्‍ल्ंयाचे NAB ने स्‍पष्‍ट केले. दरम्‍यान, आज पीटीआयचे ज्येष्ठ नेते फवाद चौधरी यांनीही कडेकोट बंदोबस्तात खान यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाबाहेरही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Imran Khan arrest Updates : वैद्यकीय अहवालात इम्रान खान फिट

जिओ ‘न्यूज’ने दिलेल्‍या वृत्तानुसार, एनएबीला सादर केलेल्या वैद्यकीय अहवालात इम्रान खानला हे शारिरीक दृष्‍ट्या पूर्ण फीट आहेत. दरम्‍यान. इम्रान खान यांना भेटण्‍यास प्रसारमाध्यमांना मज्‍जाव करण्‍यात आला आहे. पीटीआयच्या प्रमुख नेत्यांनाही सुनावणी पाहण्यास किंवा त्यांच्या नेत्याला भेटण्यास मनाई करण्यात आली आहे.

‘तेहरीक-ए-इन्साफ’चे ज्येष्ठ नेते असद उमर यांना अटक

‘पीटीआय’चे सरचिटणीस असद उमर यांनाही इस्लामाबाद पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. त्‍यांनी इम्रान खान यांच्‍या अटकेविरोधात इस्लामाबाद हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

तोशाखान प्रकरण काय आहे ?

२०१८ मध्‍ये पाकिस्‍तानमध्‍ये इम्रान खान यांचे सरकार सत्तेवर आले. या काळात त्‍यांना अरब शासकांकडून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या. भेटवस्तूंमध्ये एक महागडी मनगटी घड्याळ, कफलिंकची एक जोडी, एक महागडा पेन, एक अंगठी आणि चार रोलेक्स घड्याळांचा समावेश होता. त्या तोशाखान्यात (देशातील गोदाम) जमा करण्यात आल्या. नंतर त्यांनी सवलतीच्या दरामध्‍ये त्‍या वस्‍तू विकत घेतल्‍या आणि मोठ्या नफ्यात त्‍याची विक्री करण्‍यात आली, असा आरोप विरोधी पक्षांनी इम्रान खान यांच्‍यावर केला होता. या प्रकरणाच्‍या सुनावणीवेळी  इम्रान यांनी सांगितले होते की, २१,५६ कोटी रुपये भरल्यानंतर राज्याच्या तिजोरीतून खरेदी केलेल्या भेटवस्तूंच्या विक्रीतून सुमारे ५८ लाख रुपये मिळाले होते. यामध्‍ये कोणताही गैरव्‍यवहार झाला नसल्‍याचा दावाही त्‍यांनी केला होता. या प्रकरणी २८ फेब्रुवारी रोजी सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते.

तोशाखाना प्रकरणी इम्रान ठरले होते अपात्र

निवडणूक आयोगाने तोशाखाना प्रकरणात खोटी विधाने केल्याबद्दल पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी संसदेच्या सदस्यत्वापासून अपात्र ठरवले हाेते. पाकिस्तानी कायद्यानुसार, परदेशातील मान्यवरांकडून मिळालेली कोणतीही भेटवस्तू स्टेट डिपॉझिटरी किंवा तोशाखान्यात ठेवली पाहिजे. जर राज्याच्या प्रमुखाला भेटवस्तू ठेवायची असेल तर त्याला त्याच्या किंमतीइतकी रक्कम द्यावी लागेल. हे लिलाव प्रक्रियेद्वारे ठरवले जाते. या भेटवस्तू एकतर तोशाखान्यात ठेवल्या जातात किंवा त्याचा लिलाव केला जाऊ शकतो आणि त्यातून मिळणारा पैसा राष्ट्रीय तिजोरीत जमा होतो.

Imran Khan arrest Updates : पाकिस्तानात गृहयुद्ध पेटले

इम्रान खान यांच्या अटकेने पाकिस्तानात गृहयुद्ध पेटले आहे. इम्रान खान यांच्या अटकेच्या निषेधार्थ क्वेटा येथे काढण्यात आलेल्या रॅलीत गोळीबार झाला असून त्यात पीटीआय (pakistan tehreek-e-insaf) पक्षाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. तर अन्य ६ जण जखमी झाले. इम्रान खान यांच्या समर्थकांनी मुख्य क्वेटा विमानतळ रस्ता रोखून धरला. पीटीआयच्या रॅलीमध्ये गोळीबाराची घटना घडल्याचे वृत्त द एक्सप्रेस ट्रिब्यूनने एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा हवाल्याने दिले आहे. (Imran Khan arrest updates)

इम्रान खान यांना मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयाजवळ निमलष्करी दलाच्या रेंजर्सनी अटक केली होती. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये हिंसक निदर्शने सुरू आहेत. इम्रान खान समर्थक कमालीचे आक्रमक बनले असून, ते सर्वत्र जाळपोळ करत सुटले आहेत. अनेक ठिकाणी पोलिस आणि ‘पीटीआय’ कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाल्याचे वृत्त आहे. (imran khan pakistan news today)

इम्रान खान यांना अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली आहे. ” इस्लामाबादमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे आणि त्याचे उल्लंघन केल्यास पोलिस कारवाई केली जाईल,” असा इशारा इस्लामाबाद पोलिसांनी दिला आहे. पोलिसांनी लोकांना त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्लाही दिला आहे. (imran khan arrested)

पोलिसांनी कराची आणि लाहोरमध्ये खान यांच्या समर्थकांना रोखण्यासाठी अश्रुधूर आणि पाण्याच्या फवाऱ्याचा मारा केला. तर आंदोलकांनी इस्लामाबादसह शेजारील रावळपिंडी आणि पेशावरमध्ये रास्ता रोको केला. यामुळे वाहतूक ठप्प झाली. खान यांच्या पीटीआय पक्षाने त्यांच्या समर्थकांना पाकिस्तान बंदची हाक दिली आहे. रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयावर, पेशावरमधील फ्रंटिअर कॉर्प्सच्या मुख्यालयावर तसेच पाक गुप्तचर संघटना ‘आयएसआय’च्या मुख्यालयावरही इम्रान खान समर्थकांनी हल्लाबोल केला. ‘आयएसआय’च्या परिसरात जाळपोळ केली.

‘पीटीआय’ने लष्कराने नागरिकांवर गोळीबार केल्याचा दावा केला आहे. फैसलाबादेत सुरक्षा यंत्रणांच्या गोळीबारात १३ आंदोलक जखमी झाले आहेत. आदोलकांनी रेडिओ पाकिस्तानच्या पेशावरमधील इमारतीला आग लावली. सरकारने संपूर्ण देशात संचारबंदी (कलम १४४) लागू केली आहे. इस्लामाबाद, कराची, लाहोरसह प्रमुख शहरांत इंटरनेट बंद करण्यात आले आहे.

आंदोलकांनी लष्कराच्या कोअर कमांडरच्या घरातही नासधूस तसेच लुटालूट केली. लष्कराच्या मुख्यालयाला इम्रान समर्थकांनी घेराव घातला आणि खान यांची सुटका होत नाही, तोवर आपण या ठिकाणाहून हलणार नसल्याचा पवित्रा घेतला. ठिकठिकाणी पोलिसांची वाहनेही समर्थकांनी जाळली. पाकिस्तानी हवाई दलाच्या मियाँवाली हवाईतळावरही इम्रान समर्थक चालून गेले. येथेही जाळपोळ केली. प्रचंड गोंधळ येथे झाला. येथून जवळच ‘इसिस’चे कार्यालय आहे.

Back to top button