Nepal | नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी एअरलिफ्ट करून दिल्लीत आणले | पुढारी

Nepal | नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी एअरलिफ्ट करून दिल्लीत आणले

पुढारी ऑनलाईन : नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल (Nepal President Ramchandra) यांची प्रकृती बिघडली आहे. यामुळे त्यांना बुधवारी उपचारासाठी भारतात विमानाने आणण्यात आले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर एका महिन्याच्या आत दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्यांना पुढील उपचारासाठी भारतात विमानाने नेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

रामचंद्र पौडेल (वय ७८) यांना मंगळवारी नेपाळमधील टीयू टीचिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना छातीत जंतूसंसर्ग झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. राष्ट्रपती पौडेल यांच्यावर नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथे उपचार होणार आहेत, असे त्यांच्या प्रेस सल्लागाराकडून सांगण्यात आले आहे.

राष्ट्रपतींचे प्रेस सल्लागार किरण पोखरेल यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास राष्ट्रपतींना एअर अॅम्ब्यूलन्समधून भारतात आणण्यात आले. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा चिंतन पौडेल आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल आणि उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री पूर्ण बहादूर खडका यांच्यासह इतर नेत्यांनी मंगळवारी त्यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

गेल्या आठवड्यात पौडेल यांना पोटदुखीचा त्रास झाला होता. १ एप्रिल रोजी पौडेल यांना पोटदुखीच्या तक्रारीनंतर पहिल्यांदाच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याच्या उपचारासाठी आरोग्य सचिवांच्या नेतृत्वाखालील सरकारी अधिकाऱ्यांचे एक पथक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे पथक राष्ट्रपतींच्या आजारपणाचे मूल्यांकन करेल आणि सरकारला त्याची माहिती देईल, असे एका मंत्र्याने सांगितले.

नेपाळी काँग्रेसचे पौडेल यांची नेपाळचे नवे राष्ट्रपती (Nepal President Ramchandra) म्हणून गेल्या महिन्यात निवड झाली होती. पौडेल हे नेपाळी काँग्रेस आणि पंतप्रधान पुष्प कमल दहल यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन (माओवादी सेंटर) यांचा समावेश असलेल्या आठ पक्षांच्या आघाडीचे संयुक्त उमेदवार होते. त्यांना संसदेचे २१४ खासदार आणि ३५२ प्रांतीय विधानसभा सदस्यांची मते मिळाली होती.

 हे ही वाचा :

Back to top button