चीनची घुसखोरीची तयारी | पुढारी

चीनची घुसखोरीची तयारी

काठमांडू, वृत्तसंस्था : चीनकडून नेपाळमध्ये अनेक कामे सुरू आहेत. नेपाळच्या प्रत्येक बाबीत चीनचा हस्तक्षेपही वाढलेला आहे. बिहारला लागून नेपाळची सीमा सुमारे 730 किलोमीटर आहे. भारतीय सीमेलगत चीन नेपाळमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती करत आहे. नेपाळला थेट बिहारशी जोडणार्‍या चार पदरी महामार्गाचे कामही चीनकडून वेगाने सुरू आहे. नेपाळच्या विकासाच्या गोंडस नावाखाली सुरू असलेल्या चीनच्या या कुटिल डावावर भारताची कडक नजर आहे.

भारताकडूनही नेपाळ सीमाभागातील संवेदनशील परिसरांमध्ये मोठ्या संख्येने सीसीटीव्ही कॅमेरे आणि पथदिवे लावले जाणार आहेत. ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण सीमेवर सातत्याने टेहळणीचीही भारताची योजना आहे. नेपाळी मीडिया व रेडिओच्या माध्यमातून भारतविरोधी मोहिमेला प्रोत्साहन देणे चीनने सुरू केले आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताची योजना तयार आहे. नेपाळ-भारतादरम्यानच्या रोटी-बेटी व्यवहारावर बोलण्यासाठी भारतीय सीमेत काही एफ.एम. स्टेशनही सुरू होतील.

सुमारे 125 कि.मी. लांबीचा हा चिनी रस्ता बुटवलहून नारायण घाटापर्यंत जातो. दुसरीकडे, बरदघाटहून वादग्रस्त सुस्तासमोरील गंडक नदीपर्यंत दोन लेनच्या रस्त्याचे कामही सुरू झाले आहे. झुलत्या पुलासाठी नदीत 12 खांब टाकले आहेत. बुटवल ते नारायण घाटापर्यंत जाणारा चार पदरी रस्ता थेट चीनला जाऊन भिडत असल्याने भारतासाठी हा मोठा चिंतेचा विषय आहे. पश्चिम चंपारणपासून केवळ 25 कि.मी.पर्यंत हे बांधकाम येऊन ठेपलेले आहे.

सुस्ता भारताचा भाग असला, तरी नेपाळ त्यावर आपला दावा सांगत आहे. दुसरीकडे, नेपाळच्या बुटवलपासून ते नारायण घाटापर्यंत बनत असलेल्या चार पदरी रस्त्यावर चिनी बांधकाम कंपनीचा फलक लावलेला आहे. हा फलक भारतीय सीमेपासून अवघा 25 कि.मी. अंतरावर आहे. येथून दोन पदरी रस्ता थेट भारतीय सीमेपर्यंत होणार आहे.

Back to top button