अमृतपाल नेपाळमध्ये पोहोचला; भारताने मागितले नेपाळ सरकारचे सहकार्य; पाकिस्तानात जाण्याची शक्यता | पुढारी

अमृतपाल नेपाळमध्ये पोहोचला; भारताने मागितले नेपाळ सरकारचे सहकार्य; पाकिस्तानात जाण्याची शक्यता

नवी दिल्ली/ काठमांडू: वृत्तसंस्था : पंजाब पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटलेला खलिस्तानवादी म्होरक्या अमृतपाल सिंग नेपाळमध्ये पोहोचल्याची शक्यता आहे. तेथून तो पाकिस्तानच्या मदतीने इतर देशांत पळून जाण्याची शक्यता असल्याने भारताने नेपाळला त्याला पकडण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

गेल्या १३ दिवसांपासून पंजाब पोलिस अमृतपालच्या मागावर आहेत; पण तो त्यांच्या हाती लागलेला नाही. पंजाबनंतर तो हरियाणा व दिल्लीत दिसला होता. यालाही आता चार दिवस झाले आहेत. त्यामुळे अमृतपाल नेपाळमध्ये पोहोचला असावा, असा भारतीय गुप्तचरांचा कयास आहे. पाकिस्तानची अमृतपालला ‘आयएसआय’ संघटना मदत करत असून, त्यांच्या मदतीने तो बनावट पासपोर्टच्या आधारे तिसऱ्या देशात पलायन करण्याची शक्यता आहे. यामुळे भारताने नेपाळ सरकारला विनंती करीत अमृतपालला पकडण्यात मदत करण्याचे आवाहन केले आहे. नेपाळच्या परराष्ट्र खात्याला दिलेल्या पत्रात भारताने म्हटले आहे की, अमृतपाल भारताला हवा असून, तो सध्या नेपाळमध्ये असण्याची शक्यता आहे. तेथून तो भारतीय अथवा इतर बनावट पासपोर्टच्या मदतीने तिसऱ्या देशात पलायन करण्याची शक्यता असल्याने नेपाळमधील विमानतळांना सूचना देऊन अमृतपालला पकडण्यात भारताची मदत करावी.

नेपाळच्या ‘काठमांडू पोस्ट’ या दैनिकानेही याबाबत वृत्त दिले असून, भारताच्या नेपाळमधील दूतावासाने हे पत्र नेपाळच्या प्रशासनाकडे दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारताने नेपाळला अमृतपालची इत्थंभूत माहिती, फोटोग्राफ आदी सामग्री सोपवली असून, हॉटेल, विमानतळ व विमान कंपन्या यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यात आल्याचे त्या बातमीत म्हटले आहे.

खलिस्तान समर्थकांची टाईम्स स्क्वेअरमध्ये अमृतपालसाठी रॅली

न्यूयॉर्कच्या जगप्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरमध्ये खलिस्तान समर्थकांनी रविवारी एक वाहन रॅली काढत अमृतपालच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. खलिस्तानचे झेंडे लावलेल्या अनेक कार या चौकात आल्या. तेथे मोठ्या आवाजात गाणी वाजवत व घोषणा देत त्यांनी अमृतपालला अटक करू नये, अशी मागणी केली. याचवेळी टाईम्स स्क्वेअरमधील जाहिरात फलकांवर अमृतपालचे फोटो आणि त्याच्या समर्थनातील घोषणा झळकावण्यात आल्या.

अमृतपालविरोधात मोर्चा; भगतसिंगांचा पुतण्या, सुखदेव यांचा नातूही सहभागी

गुरुग्राम: वृत्तसंस्था : वारिस पंजाब दे’चा प्रमुख खलिस्तानवादी अमृतपाल याच्याविरोधात शिखांनी हरियाणातील गुरुग्रामपासून रेवाडीतील धरुहेरा शहरापर्यंत ३० कि.मी. लांबीचा मोटारसायकल मोर्चा काढला. यात तीन हजारांहून अधिक दुचाकीस्वार सहभागी झाले होते. दुचाकीस्वार हातात तिरंगा घेऊन होते. अमृतपालला देशद्रोही ठरवण्यात येऊन फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी शीख बांधवांनी केली.भगतसिंग यांचे पुतणे तसेच सुखदेव यांचे नातूही या मोर्चात सहभागी झाले होते. भगतसिंग यांचा पुतण्या किरणजित आणि सुखदेव यांचा नातू अनुज यांनी देशद्रोह्याबद्दल सरकारने शून्य सहिष्णुता धोरण अवलंबावे, अशी मागणी केली.. आपल्या जीवाची पर्वा न करता देशासाठी लढणाऱ्या पंजाबला आणि शिखांना अमृतपालसारखे लोक बदनाम करत असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला.

Back to top button