Boyfriend- Girlfriend on rent : भाड्याने बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड मिळण्याचा नवा ट्रेंड, जाणून घ्या काय आहे हे? | पुढारी

Boyfriend- Girlfriend on rent : भाड्याने बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड मिळण्याचा नवा ट्रेंड, जाणून घ्या काय आहे हे?

  • वर्ल्ड वॉच 

आपल्या जीवनात एखादी तरी गर्लफ्रेंड अथवा बॉयफ्रेंड असावा असे प्रत्येकाला वाटते. मात्र, प्रत्येक जण यामध्ये नशीबवान असतोच असे नाही. आतापर्यंत भाड्याने दुकान, खोली, घरे, गाड्या, बस मिळत असल्याचे आपण ऐकले होते. मात्र, कधी तुम्ही भाड्याने गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड मिळत असल्याचे ऐकले आहे काय? कमाल आहे नाही, काय भन्नाट कल्पना आहे. चीनमध्ये भाड्याने गर्लफ्रेंड मिळण्याचा एक नवा फंडाच सुरू झाला आहे. पैसा मिळवण्याचे ते एक उत्तम माध्यम असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषतः सुट्टीच्या काळात गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडची मागणी वाढते.

गेल्या १५ वर्षांपासून चीनमधील वुहान शहरातील एका शॉपिंग सेंटरने १५ मुली उपलब्ध करून दिल्याची बातमी जगभरात पसरली होती. शॉपिंग कॉम्पलेक्सच्या दरात अनेक मुली उभ्या असायच्या त्यातील आवडेल ती मुलगी निवडायची. त्यानंतर त्या मुलीला शॉपिंग, लंच आणि डिनरला घेऊन जाऊ शकता. मात्र, त्यातील एक अट आहे, त्या मुलीला तुम्ही अजिबात टच करायचे नाही, हे विशेष! भविष्यात जगभरात हा मोठा व्यवसाय होईल, असा दावा त्यावेळी त्या सेंटरने केला होता.

नुकतेच चिनी एका पत्रकाराने गर्लफ्रेंड अथवा बायफ्रेंड मिळण्याच्या कामाची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला. त्याने एका संकेतस्थळावर बनावट अकाऊंट सुरू केले आणि गर्लफ्रेंडची मागणी केली. त्यानंतर सोशल मीडियावरून एका महिलेने पत्रकाराशी संपर्क धाला. सर्व अटी मान्य केल्यानंतर ती महिला पत्रकाराला भेटायला आली. जपानमध्ये बॉयफ्रेंडची मोठ्या प्रमाणात मागणी असून, मुली बॉयफ्रेंडला (सूडो) एक तासासाठी ५ हजार जपानी येन म्हणजे ३ हजार १५६ रुपये देतात. जपानच्या सोइने या प्राईम नावाच्या कंपनीने २०११ पासूनच अशी सेवा देण्यास सुरुवात केली आहे.

भारतातील स्थिती

भाड्याने बॉयफ्रेंड अथवा गर्लफ्रेंड मिळण्याची ट्रेंड जपान आणि चीन या दोन आशियाई देशांत लोकप्रिय होत असताना भारत यामध्ये मागे नाही. २०२२ मध्ये बंगळुरात मोहित चुरीवाला आणि आदित्य लखियानी द बेटर डेट नावाचे अॅप सुरू केले. भाड्याने बॉयफ्रेंड देण्याचे काम हे ॲप करते. त्याचप्रमाणे टॉयबॉय नावाचे एक पोर्टलही बंगळुरात चालविले जात आहे. ॲप डाऊनलोड केल्यानंतर मुलांची प्रोफाईल डिस्प्ले होते. गेल्या व्हॅलेंटाईन डे च्या वेळी युवा वर्गाची मोठी चलती होती.

– युवराज इंगवले

Back to top button