इम्रान खान यांच्या घरावर बुलडोझर | पुढारी

इम्रान खान यांच्या घरावर बुलडोझर

लाहोर/इस्लामाबाद; वृत्तसंस्था :  माजी पंतप्रधान इम्रान खान इस्लामाबाद न्यायालयात हजर राहण्यासाठी निघाल्यानंतर पोलिस लाहोरच्या घरात घुसले. बुलडोझर लावून गेट तोडत शेकडो पोलिस घुसल्यावर इम्रान यांच्या समर्थकांसोबत जोरदार चकमकी झडल्या. समर्थकांनी तुफान दगडफेक केली; तर पोलिसांनी लाठीमार, अश्रुधुराचा वापर केला. या चकमकीत 16 जण जखमी झाले असून, 30 जणांना अटक करण्यात आली आहे.

तोशाखाना आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून इम्रान खान यांना तुरुंगात टाकण्यासाठी जंग जंग पछाडणार्‍या पाकिस्तानी पोलिस यंत्रणेने शनिवारी इम्रान यांच्या घरावर छापा टाकला. इस्लामाबाद येथे उच्च न्यायालयात सुनावणीसाठी इम्रान खान आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह रवाना झाले. त्यावेळी इम्रान खान यांच्या लाहोरच्या निवासस्थानी त्यांचे समर्थक मोर्चे बांधून तयार होते. पोलिसांना रोखण्यासाठी जागोजागी अडथळे लावण्यात आले होते; तर लाठ्या-काठ्या आणि दगड-विटांचा साठाही करून ठेवण्यात आला होता. शेकडो कार्यकर्ते इम्रान यांच्या घरावर पहारा देत होते. इम्रान यांचा ताफा रवाना होताच पोलिसांच्या तुकड्या चारी बाजूंनी चाल करीत आल्या आणि त्यांनी चक्क बुलडोझर लावून इम्रान यांच्या घराचे गेट तोडत आत प्रवेश केला.

माध्यमांवर प्रसारणबंदी

तिकडे इस्लामाबादपर्यंत इम्रान यांचे पथक पोहोचल्यावर न्यायालयाजवळ इम्रान यांच्या हजारो समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. त्यात अनेक पोलिस जखमी झाले. सुनावणीसाठी न्यायालयात जाणेही इम्रान यांना अवघड बनले. पाकिस्तान सरकारने इस्लामाबादमधील वार्तांकन लाईव्ह करण्यास बंदी घातल्याने माध्यमांना लाईव्ह फुटेज दाखवता आले नाही.

पत्नी घरात असताना पोलिसांचा कब्जा

तेथे असलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार हल्ला चढवत पोलिसांना मागे रेटण्याचा प्रयत्न केला; पण शेकडोंच्या संख्येने आलेल्या पोलिसांनी जमावावर अश्रुधुराचा आणि रबरी गोळ्यांचा वापर करीत त्यांना मागे रेटले. हे रणकंदन सुरू असताना इम्रान यांच्या पत्नी बुशरा बेगम घरातच होत्या. पोलिसांनी जमावाला भेदत घराचा ताबा घेतला व तपासणी सुरू केली. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत 30 जणांना अटक करण्यात आली असून, 16 जण जखमी झाले आहेत.

Back to top button