मानेबे, हॅसलमन, पेरिसींना भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार जाहीर | पुढारी

मानेबे, हॅसलमन, पेरिसींना भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार जाहीर

स्टॉकहोम ; वृत्तसंस्था : भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची (2021) मंगळवारी घोषणा झाली. जपानी अमेरिकन शास्त्रज्ञ स्यूकुरो मानेबे, जर्मन शास्त्रज्ञ क्लॉस हॅसलमन आणि इटालियन शास्त्रज्ञ ज्योर्जियो पेरिसी यांना संयुक्‍तपणे नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला.

हवामान आणि जटिल भौतिक प्रणालीतील संशोधनासाठी या तिघांना स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसतर्फे गौरविले जाणार आहे. मानेबे हवामान शास्त्रज्ञ असून जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे.

तर हॅसलमन हे समुद्र शास्त्रज्ञ असून त्यांनी हवामान बदलाचे मॉडेल तयार केले आहे. पेरिसी हे सैद्धांतिक शास्त्रज्ञ असून क्‍वाँटम थेअरी आणि सांख्यिकीय मेकॅनिझम आणि जटिल भौतिक प्रणाली यावर त्यांनी संशोधन केले आहे.

नोबेल पुरस्काराचे महासचिव थॉमस पर्लमॅन यांनी ही घोषणा केली. सुवर्ण पदकासह 11 लाख डॉलर्सपेक्षा जास्त रोख पारितोषिक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गेल्या वर्षी रॉजर पेनरोस आणि रेनहार्ड गेन्जेल आणि अँड्रिया गेज यांना संयुक्‍तपणे नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. कृष्णविवर निर्मितीच्या जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीच्या संशोधनासाठी हा पुरस्कार दिला होता.

हवामान आणि तापमानवाढ बदलातील संशोधनासाठी गौरव

मानेबे, हॅसलमन यांनी पृथ्वीवरील जलवायूचे भौतिक मॉडेल तयार केले. या मॉडेलच्या माध्यामातून जलवायूमध्ये होणारे बदल आणि जागतिक तापमानवाढीचा अंदाज वर्तवण्यास मदत होणार आहे; तर पेरिसी यांनी संशोधनात अणूपासून ते ग्रहांच्या भौतिक प्रणालीमध्ये वेगाने होणारे बदल आणि विकारांमधील होणारे चढउतार यातील परस्पर संबंधांचा अभ्यास केला आहे.

Back to top button