विध्‍वंस सुरुच…युक्रेनमध्‍ये वर्षभरात सात हजारांहून अधिक नागरिक ठार, ८० लाख विस्‍थापित

विध्‍वंस सुरुच…युक्रेनमध्‍ये वर्षभरात सात हजारांहून अधिक नागरिक ठार, ८० लाख विस्‍थापित
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ७ हजार १९९ नागरिकांचा मृत्‍यू, ११ हजार ८०० हून अधिक नागरिक गंभीर जखमी आणि ८० लाख नागरिकांचे स्‍थलांतर. ही मागील एक वर्षातील युक्रेनमधील आकडेवारी रशिया-युक्रेन युद्धाची भयावहता स्‍पष्‍ट करते. आज २४ फेब्रुवारी. बलाढ्य रशियाने चिमुकल्‍या युक्रेनवर हल्‍ला केल्‍याच्‍या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत आहेत. गेली एकवर्ष युक्रेन रशियाशी झूंज देत आहे. त्‍याला अमेरिका आणि युरोपमधील मित्र राष्‍ट्रांची भक्‍कम साथही मिळत आहे. मात्र या युद्धाने युक्रेनमधील मूलभूत सुविधांसह सर्वसामान्‍य नागरिकांचं जगणं उद्ध्वस्त केले आहे. जाणून घेवूया  वर्षभरातील ठळक घटनांविषयी…

७, १९९ नागरिकांचा मृत्‍यू , ८० लाखांहून अधिक विस्‍थापित

युक्रेनमधून मागील एका वर्षात ८० लाख नागरिक विस्‍थापित झाले आहेत. देशनिहाय विस्‍थापितांची संख्‍या
युक्रेनमधून मागील एका वर्षात ८० लाख नागरिक विस्‍थापित झाले आहेत. देशनिहाय विस्‍थापितांची संख्‍या

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर हल्‍ला केला. त्‍याला तेवढेच जोरकसपणे  युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी प्रत्‍युत्तर दिले. एक वर्ष सूरु असलेल्‍या या युद्धात दोन्‍ही देशांमधील हजारो जवानांनी प्राणाहुती दिली. हजारो महिला विधवा झाल्‍या. हजारो मातांनी आपल्‍या सुपुत्रांना गमावलं आहे. संयुक्‍त राष्‍ट्रच्‍या (युनो) मानवाधिकार आयोगाने दिलेल्‍या माहितीनुसार, १३ फेब्रुवारी २०२३ या तारखेपर्यंत युक्रेनमध्‍ये एकूण ७ हजार १९९ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. यामध्‍ये ४३८ मुलांचा समावेश आहे. जखमींची संख्‍या ११ हजार ८०० हून अधिक आहे. स्‍थानिक पातळीवर ही आकडेवारी अधिक असू शकते, असेही 'युनो'ने स्‍पष्‍ट केले आहे. रशियाकडून सुरुवातीच्‍या काळात झालेल्‍या जोरदार हवाई हल्‍ल्‍यानंतरही युक्रेनमधील बहुतांश नागरिकांनी देशातच राहण्‍याचा निर्धार केला. आतापर्यंत ८० लाखांहून अधिक नागरिकांनी युरोपमधील विविध देशांमध्‍ये आश्रय घेतला आहे.

युक्रेनमधील सर्वसामान्‍य जनतेचा अस्‍तित्‍वची लढाई सूरुच

युक्रेननमधील ३० लाख नागरिक देशांतर्गत विस्‍थापित झाले आहेत. त्‍यांनी सामूहिक निवारा छावणीमध्‍ये आश्रय घेतला आहे. बॉम्‍बपासून संरक्षण मिळावे यासाठी हजारो नागरिकांनी स्‍वत:ला तळघरात कोंडून घेतले आहे. युक्रेनच्‍या प्रमुख शहरांमधील रहिवासी इमारती, शाळा, रुग्‍णालये आणि सर्व नागरिक पायाभूत सुविधा उद्‍ध्‍वस्‍त झाल्‍या आहेत. सर्वधिक फटका ग्रामीण भागातील शेतीला बसला आहे. आज युक्रेनमधील कृषीक्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांना आवश्‍यक साधनसामुग्रीपासून वंचित राहावे लागत आहे. आज बहुतांश युक्रेनमधील वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या मदतीने बेकरीने उत्पादन वाढविले जात आहेत. युक्रेननमध्‍ये सध्‍या ६५० हून अधिक मानवतावादी संस्‍था कार्यरत आहेत.

पुरवठा साखळीत अडथळा, जगभरात महागाईचा भडका

रशियाने युक्रेनवर हल्‍ला केल्‍याचे जगभर पडसाद उमटले. अन्‍न आणि ऊर्जेच्या किमती वेगाने वाढल्या. आज रशिया हा तेल, नैसर्गिक वायू, गहू, वनस्‍पती तेल आणि खतांचा प्रमुख उत्‍पादक आहे. तसेच युक्रेन हा देश जगातील प्रमुख गहू उत्‍पादक देशांपैकी एक आहे. या दोन्‍ही देशांमधील युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळीत अडथळा निर्माण झाला आहे. पुरवठा साखळीच ब्रेक झाल्‍याने जगभरातील महागाईत मोठी वाढ झाली आहे.

अमेरिकेसह मित्रराष्‍ट्रांशी युक्रेनला भरीव मदत

आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेने ( OECD ) नोव्‍हेंबर २०२२ मध्‍ये व्‍यक्‍त केलेल्‍या अंदाजानुसार, या संघटनेच्‍या युरोपमधील देशांमध्‍ये महागाईचा दर ९ टक्‍क्‍यांपेक्षा जास्‍त राहील. युद्ध सुरु झाल्‍यानंतर अमेरिका आणि त्‍याच्‍या मित्र राष्‍ट्रांनी युक्रेनला आतापर्यंत तब्‍बल ५० अब्‍ज डॉलरची लष्‍करी आणि आर्थिक मदत केली आहे. तसेच इंग्‍लंड, जर्मनी आणि कॅनडानेही युक्रेनला आर्थिक सहाय्‍य केले आहे.

रशियाचा आत्‍मविश्‍वास ठरला पोकळ

२४ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे रशियाने युक्रेनवर हल्‍ला केला. युक्रेनमध्‍ये अमेरिकेच्‍या नेतृत्त्‍वाखालील 'नाटो'ला विरोध करण्‍यासाठी हा हल्‍ला केल्‍याचा दावा रशियाने केला होता. अवघ्‍या काही दिवसांमध्‍ये युक्रेन आमच्‍या टाचेखाली असेल, असा विश्‍वास रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन व्‍यक्‍त करत होते. मात्र आज एका वर्षानंतरही युक्रेन आपल्‍या निर्णयांवर ठाम आहे. तर रशियाचा आत्‍मविश्‍वास पोकळ ठरल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. आता युद्ध किती दिवस चालणार? या प्रश्‍नाचे उत्तर सध्‍या तरी कोणाकडेच नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news