युक्रेनला रशिया जिंकू शकणार नाही : बायडेन

युक्रेनला रशिया जिंकू शकणार नाही : बायडेन

वार्सा; वृत्तसंस्था : रशिया युक्रेनला कधीच जिंकू शकणार नाही, असे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बुधवारी ठणकावून सांगितले. पुतीन यांनी रशियन संसदेसमोर केलेल्या भाषणातील सर्व मुद्दे बायडेन यांनी खोडून काढले. रशियन सैन्य क्रूर आहे. रशियन सैनिकांनी युक्रेनमध्ये निरपराध नागरिकांना तर मारलेच, पण महिलांवर बलात्कारही केले, असा गंभीर आरोपही बायडेन यांनी केला.

युक्रेनच्या अचानक दौर्‍यानंतर बायडेन पोलंडला पोहोचले. पोलंडच्या राजधानीत (वार्सा) झालेल्या जाहीर सभेत पुतीन यांची वक्तव्ये त्यांनी कडक शब्दांत खोडून काढली. अमेरिका आणि नाटो युक्रेनसोबत होते आणि असतील. युक्रेनला पुतीन कधीही जिंकू शकणार नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावे. रशियाने युद्ध टाळण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही. उलट युक्रेनवर युद्ध लादले, असा पलटवार बायडेन यांनी केला. आम्ही युद्ध टाळण्याच्या प्रयत्नात होतो, पण अमेरिका आणि नाटोने आमचे प्रयत्न निष्फळ ठरविले, असा आरोप पुतीन यांनी मंगळवारी केला होता. आम्ही (अमेरिका) रशियाला ताब्यात ठेवू इच्छितो, हा पुतीन यांचा दावा खोटा आहे.

अमेरिका वा युरोपातील लोक रशियन जनतेचे हितचिंतकच आहेत, रशियाला उद्ध्वस्त करण्याचा आम्ही विचारही करत नाही, हे मी रशियन जनतेला सांगू इच्छितो. पुतीन यांनीच युक्रेनमधील मुलांचे भवितव्य उद्ध्वस्त केलेले आहे. शाळांवर, वसतिगृहांवर पुतीन यांच्या फौजांनी बॉम्ब टाकले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news