युक्रेनच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय लढता? स्वत: मैदानात या! | पुढारी

युक्रेनच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय लढता? स्वत: मैदानात या!

मॉस्को, वृत्तसंस्था : आम्ही युक्रेनसोबत युद्ध टाळण्याचे अनेक प्रयत्न केले. नाटो व अमेरिकेने ते निष्फळ ठरवले. आताही आम्ही चर्चेला तयार आहोत, पण त्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांची कुठलीही अट आम्हाला मान्य नाही, असे ठणकावून सांगताना युक्रेनच्या जनतेशी आमचे वैर नाहीच. हे लोक आमचेच आहेत, असेही रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी स्पष्ट केले.

रशिया-युक्रेन युद्धाला 24 फेब्रुवारी रोजी 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्त संसदेला संबोधित करताना पुतीन बोलत होते. डोनेट्स्क आणि लुहान्स्क हे रशियाचे भाग आहेत. तेथील जनतेलाही रशियातच राहायचे आहे म्हटल्यावर विषय इथेच संपतो, पण युक्रेनचे कथित नेते व्लादिमीर झेलेन्की यांनी तो अमेरिकेच्या पुढ्यात नेला. अमेरिकेने युक्रेनला मुर्ख बनविले.

आम्ही आहोत तुम्ही लढा म्हणून फूस दिली. आम्हाला युद्धात कुणीच हरवू शकत नाही, हे अमेरिकेने लक्षात घ्यावे. अरे युक्रेनच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय लढता? हिंमत असेल तर स्वत: मैदानात या, असेही पुतीन म्हणाले. पुतीन यांचे तासाभराचे भाषण अवघ्या रशियाने तर ऐकलेच, पोलंडच्या वार्सात मुक्कामी असलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनीही (बायडेन) त्यातला शब्दन् शब्द कान देऊन ऐकला. पुतीन यांना काय उत्तर द्यायचे, त्याची आता बायडेन तयारी करत आहेत.

जी 7 चे कौतुक का? जी 7 वर संताप का?

जगातील सर्वाधिक श्रीमंत देशांच्या जी-7 संघटनेने गरिब देशांच्या मदतीसाठी 60 अब्ज डॉलर दिले, मला त्याचे कौतुकच आहे.
त्याचवेळी जी-7 ने युद्धासाठी म्हणून 150 अब्ज डॉलरचा फंड राखीव ठेवला. हा दुटप्पीपणा नाही काय? मला त्याचा राग आहे.

भाषणातील ठळक मुद्दे

रशिया व युक्रेनचा विषय स्थानिक होता. अमेरिकेने तो आंतरराष्ट्रीय बनवला.
युक्रेनच्या जनतेशी आमचे युद्ध नाही. युक्रेन सरकारकडूनच जनता ओलिस.
अमेरिका आणि अमेरिकेचे मित्र युक्रेनपर्यंत येऊन ठेपल्याने रशिया असुरक्षित.
रशियाच्या सुरक्षेसाठी कोणतीही किंमत मोजायला मी तयार आहे. तडजोड नाहीच.
शांतताच हवी तर अन्य देशांत लष्करी तळे का उभारता, हा माझा यूएसला प्रश्न आहे.
रशियावरील निर्बंध हटले तर जगाला भेडसावणारी अन्नधान्याची समस्या सोडवू.

Back to top button