तुर्की-सीरियातील भूकंपबळींची संख्‍या ३७ हजारांवर, बचाव कार्य अंतिम टप्‍प्‍यात | पुढारी

तुर्की-सीरियातील भूकंपबळींची संख्‍या ३७ हजारांवर, बचाव कार्य अंतिम टप्‍प्‍यात

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तुर्कस्‍तान आणि सारियात ६ फेब्रुवारी रोजी झालेल्‍या शक्‍तीशाली भूकंपातील मृतांची संख्‍या आज ( दि. १४ ) ३७ हजारांवर गेली आहे. मृतांमध्‍ये तुर्कस्‍तानमधील ३१ हजार ६४३ तर सीरियातील ५ हजार ७१४ नागरिकांचा समावेश आहे, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. दरम्‍यान, दोन्‍ही देशांमधील बचाव कार्य आता अंतिम टप्‍प्‍यात आले आहे. ( Turkey-Syria earthquake  )

तुर्कस्‍तान आणि सीरियांसाठी महाविनाशकारक ठरलेल्‍या भूकंपाच्‍या घटनेला आता आठ दिवसांहून अधिक दिवस झाले आहेत. या काळात तुर्कस्‍तानमध्‍ये हजारो नागरिकांचा बचाव करण्‍यात यश आले आहे. आता जसे दिवस वाढत जातील तसे इमारतींच्‍या ढीगार्‍याखाली अडकलेल्‍या वाचलेल्‍यांची संख्‍या धुसर असेल, असे मानले जात आहे. ( Turkey-Syria earthquake: )

बचाव कार्याबद्दल माहिती देताना संयुक्‍त राष्‍ट्रांच्‍या मदत विभागाचे प्रमुख मार्टिन ग्रिफिथ्स यांनी सांगितले की, तुर्कस्‍तान आणि सीरियातील बचाव कार्य आता अंतिम टप्‍प्‍यात आले आहे. आम्‍ही आता भूकंपातून बचावलेल्‍या नागरिकांसाठी निवारा, अन्न आणि शालेय शिक्षण यावर लक्ष केंद्रित केले आहे. दरम्‍यान, रॉयटर्सने दिलेल्‍या माहितीनुसार, परिसरातील तापमान उणे 6 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले असून त्यामुळे अंतिम टप्‍प्‍यात आलेल्‍या बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.

Turkey-Syria earthquake: तुर्कीचे तब्‍बल ८४ अब्ज डॉलर्सचे नुकसान

शक्‍तीशाली भूकंपामध्‍ये तुर्कस्‍तानचे प्रचंड नुकसान झाले आहे. तब्‍बल ८४ अब्‍ज डॉलर्स एवढे नुकसान झाले असावे, असे तुर्कस्‍तानमधील एका अशासकीय संस्‍थेने म्‍हटले आहे. भूकंपानंतर देशभरात तब्‍बल ४२ हजारांहून अधिक इमारती कोसळल्‍या आहेत. देशातील १० शहरांमध्‍ये मोठी जिवीत व वित्त हानी झाल्‍याची माहिती तुर्कस्‍तानचे शहर विकास मंत्री मुरत कुरुम यांनी दिली. भूकंपातून बचावलेल्‍या नागिरांना मूलभूत सुविधा पुरविण्‍याचे आव्‍हान आपत्त्‍कालीन व्‍यवस्‍थेसमोर आहेत.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button